मुंबईहून चेन्नईला पोहोचलेले विमान विमानतळावर उतरत असताना विमानतळावरील एका वाहनाला किंचित धक्का लागल्याने विमानाच्या पंखांचे नुकसान झाले. या विमानात १६८ प्रवासी होते आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
एआय५७० हे विमान सकाळी ९ वाजता विमानतळावर उतरले. विमानतळावर उभ्या असलेल्या एका वाहनाला विमान उतरत असताना विमानाच्या डाव्या पंखाच्या बाजूने घासले. जेट एअरवेजच्या एका विमानातील अन्नपदार्थाची पाकिटे सदर वाहनात भरण्याचे काम सुरू असताना एअर इंडियाच्या विमानाच्या पंखांचा धक्का वाहनाला बसला.  
परंतु, विमानाचे फारसे नुकसान झाले नसून हे विमान पुन्हा मुंबईकजे उड्डाण करण्यासाठी सुरक्षित आणि योग्य आहे, असे तपासणीनंतर एअर इंडियाच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले. विमानतळावर उभे असलेले अन्नपदार्थ वाहून नेणारे वाहन व्यवस्थितरित्या उभे करण्यात आले नव्हते. त्यामुळे कामराज घरगुती टर्मिनसच्या ठिकाणी हा छोटा अपघात झाला असे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.