Voting For Vice-President Election: मंगळवारी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने संख्याबळ असल्याचे दिसून येत आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती पी सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे. मात्र, बीजेडी आणि बीआरएसने कोणालाही मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राधाकृष्णन यांच्या विजयाच्या शक्यता आणखी वाढल्या आहेत.

नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी आणि के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस, यांनी समोवारी जाहीर केले की, त्यांचे खासदार या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नाहीत. हे दोन्ही पक्ष एनडीए किंवा इंडिया आघाडीचा भाग नाहीत.

एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, तर सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. २१ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लागली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभेचे २३९ आणि लोकसभेचे ५४२ असे एकूण ७८१ खासदार मतदान करणार आहेत. हे आकडे स्पष्टपणे एनडीएच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. कारण एनडीएकडे ४२५ खासदार. यामध्ये एकट्या भाजपाचे दोन्ही सभागृहात ३४२ खासदार आहेत. विरोधी इंडिया आघाडीकडे ३२४ खासदार आहेत, तर काँग्रेसचे दोन्ही सभागृहात एकूण १२६ खासदार आहेत. शिवाय वायएसआरसीपीच्या पाठिंब्यामुळे एनडीएची संख्या वाढली आहे.

बीआरएस आणि बीजेडीने मतदानास गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याने, इलेक्टोरल कॉलेज ७७० मतांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये बहुमताचा आकडा ३८६ असेल. २०२२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीने त्यांच्या त्यांच्या खासदारांना एकत्र केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाच्या इतर मंत्री आणि खासदारांसह, ७ सप्टेंबर रोजी दिल्लीत सुरू झालेल्या संसद कार्यशाळेत सहभागी झाले होते. याचबरोबर एनडीएने त्यांच्या खासदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बैठक घेतली आहे. ज्यांनी एका मॉक पोलचाही समावेश होता.

दुसरीकडे सोमवारी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राजद, झामुमो, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सीपीआय आणि सीपीआय-एम या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेतली. यामध्ये त्यांच्या खासदारांनी मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी मॉक पोलही घेण्यात आला.