नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, बुधवारी ‘इंडिया’ आघाडीमध्येच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी मतफुटीची चौकशी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी मतफुटीचे खापर आम आदमी पक्षावर (आप) फोडले. त्यामुळे विरोधकांमध्ये मतफुटीवरून मतभेद तीव्र झाल्याचे दिसू लागले आहे.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना ४५२ मते पडली. ‘एनडीए’ला अपेक्षित असलेल्या ४३८-४४० मतांपेक्षा किमान १२ ते १४ मते जास्त मिळाली. त्यामुळे विरोधकांची मते फुटल्याचा दावा ‘एनडीए’च्या नेत्यांनी केला. राधाकृष्णन यांना मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल विरोधकांचा ‘सदसद्विवेक’ कारणीभूत होता, असा संदेश ‘एक्स’वर प्रसिद्ध करत केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी सदस्यांच्या मतफुटीवर बोट ठेवले.
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाचे एकही मत फुटलेले नाही, असे स्पष्ट केले. मतदान गुप्त पद्धतीने झाले तर कोणाची मते फुटली हे कसे ठरवता येईल. विनाकारण महाराष्ट्राला जबाबदार कशासाठी धरले जात आहे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मतफुटीचा दावा फेटाळला. काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचा उद्या शपथविधी
उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेले सी. पी. राधाकृष्णन यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पदाची शपथ देतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात एका औपचारिक समारंभात हा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. ६७ वर्षीय राधाकृष्णन यांनी मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला होता.