जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधी यादीला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले. उपराष्ट्रपतींची निवड राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य तसेच लोकसभेचे निवडून आलेले सदस्य यांचा समावेश असलेल्या ‘इलेक्टोरल कॉलेज’द्वारे केली जाते.
निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले की, २०२५ च्या उपराष्ट्रपती पद निवडणुकीसाठी ‘इलेक्टोरल कॉलेज’ यादी अंतिम केली आहे. आयोगाच्या कार्यालयात अधिसूचनेच्या तारखेपासून ही यादी उपलब्ध असेल. कार्यकाळ संपण्यापूर्वीच धनखड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. संविधानाच्या कलम ६८ च्या कलम २ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेवर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली जाते.