Vice President Election INDIA alliance Candidate : निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियाही सुरू झाली आहे. या अधिसूचनेनुसार, २१ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर, ९ सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील. तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीने देखील त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. रेड्डी हे इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही वेळापूर्वी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

‘इंडिया’तील नेत्यांची तुषार गांधी व अन्नादुराई यांच्याऐवजी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला पसंती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अन्नादुराई यांच्या नावावर चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुषार गांधी यांचं नाव सुचवलं होतं. तर, द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने अन्नादुराई यांचं नाव पुढे केलं होतं. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गांधी व अन्नादुराई यांच्याबरोबर रेड्डी यांचं नाव देखील पुढे आलं. त्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली आहे.

रेड्डी, गांधी व अन्नादुराई यांच्यापैकी कोणाची निवड करायची याचा निर्णय इंडिया आघाडीने राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला होता. यासंबंधी अधिक चर्चा करण्यासाठी खरगे, शरद पवार व इंडिया आघाडीतील प्रमुख नेते काही वेळापूर्वी भेटले. या भेटीवळी सर्वांच्या सहमतीने इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सुदर्शन रेड्डी यांचं नाव निश्चित झालं आहे.

तृणमूलसह सर्व पक्षांची सहमती

याआधीच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील तृणमूल काँग्रेसचा इंडिया आघाडीतील चर्चेला विरोध होता. मात्र, यावेळी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.