नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही, पाश्चिमात्य माध्यमे धर्मनिरपेक्षता आणि भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर भारत सरकारला कमी लेखतात, भारताचा होत असलेला उदय काही जणांच्या पचनी पडत नाही, त्यांना अपचनाचा त्रास होतो, अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी भारतीय लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना फटकारलं.

नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांच्या ‘डेमोक्रेसी, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स’ या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमात नायडू यांनी आपले मत व्यक्त केले.

भारतीय संविधान सर्वाचे हित लक्षात घेऊन नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते. जात, धर्म, वर्ग, रंग, प्रदेश याची पर्वा न करता भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी काम करण्याची संधी दिली आहे. धर्मनिरपेक्षता भारतीयांच्या रक्तातच नव्हे तर नसानसांमध्ये भिनलेली आहे. त्यासाठी परकीय शक्तींच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. भारतीय लोकशाहीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नायडू यांनी भारतीय लोकशाही मूल्यांचा तपशीलवार उल्लेख केला. 

काही पाश्चिमात्य आणि अमेरिकन यंत्रणांच्या कार्यप्रणालीवरील अलीकडील प्रतिकूल अहवालांच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी प्रभावी पुराव्यावर आधारित सत्य समोर आणल्याबद्दल सूर्यप्रकाश यांचे कौतुक केले.