Israel Attacks Syria Military Headquarters Video: मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, स्वेदा येथे झालेल्या संघर्षात ड्रुझ अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा हवाला देत इस्रायलने बुधवारी दमास्कसमधील सीरियाच्या लष्करी मुख्यालयावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायली संरक्षण दलांनी बुधवारी रात्री दमास्कसमधील संरक्षण मंत्रालयाजवळील सीरियाच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला. सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, किमान १८ जण जखमी झाले आहेत, असे सीरियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

इस्रायली संरक्षण दलांनी म्हटले आहे की, हा हल्ला दक्षिण सीरियातील ड्रुझ नागरिकांविरुद्ध सीरियाच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून करण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, सरकारच्या निर्देशांनुसार कारवाया सुरू राहतील आणि पुढील घटनांसाठी सैन्य सतर्क आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सीरियाच्या सैन्याने सीमावर्ती भागातून माघार घेतली नाही, तर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, इस्रायलच्या या हल्ल्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बुधवारी सीरियाच्या दमास्कसमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांना खूप चिंता वाटत आहे.

सीरियाच्या दमास्कसमध्ये इस्रायलने डागलेले बॉम्ब सीरियाच्या लष्करी इमारतीवर पडल्यानंतर, इमारतीच्या मागे असलेल्या एका इमारतीत वार्तांकन करत असलेल्या सीरियन महिला पत्रकाराने आपल्या सीटवरून उठून धाव घेतल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या हल्ल्याचा व्हिडिओ इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी शेअर केला असून, त्यांनी याला “वेदनादायी हल्ले सुरू झाले आहे” असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये महिला पत्रकार शांतपणे कॅमेऱ्यासमोर बोलत असताना, अचानक तिच्या मागे असलेल्या इमारतीत स्फोट झाल्याचे दिसते आणि त्यानंतर ती खुर्चीवरून उठून धावताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात इराणशी झालेल्या युद्धादरम्यान, इस्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर लाईव्ह शोदरम्यान बॉम्बहल्ला केला होता, ज्यामुळे अँकरला प्रक्षेपणाच्या मध्यभागी पळून जावे लागले होते.