पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे चर्चेचा विषय असतात. करोनापूर्वी तर पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशातच जास्त असतात, अशी टीकाही विरोधकांकडून केली जात होती. परंतु करोनाची साथ आल्यापासून मोदींचे विदेश दौरे कमी झाले होते. मात्र, अलिकडेच ते युरोप आणि जपान दौऱ्यावर गेले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेल्या ८ वर्षात अनेक देशांच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. मोदींनी या आठ वर्षात किती देशांचे दौरे केलेत हे जाणून घेऊयात.
मे २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११८ परदेश दौरे केले आहेत, ज्यात त्यांनी तब्बल ६३ देशांना भेटी दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सर्वाधिक ३० परदेश दौरे २०१५ साली केले आहेत. तर सर्वात कमी ७ दौरे त्यांनी २०२१ या वर्षात केले. २०२२ मध्ये मोदींनी पाच देशांना भेटी दिल्या आहेत. तर २०२२ याच वर्षात मोदी ब्रिक्स, जी-७, जी-२० आणि २० व्या सार्क परिषदेसाठी परदेश दौरे करणात आहेत. याशिवाय इतर काही देशांना ते या वर्षात भेटी देतील.
(हे ही वाचा: “तो निर्णय वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी…”; पत्नीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, कारण…)
मोदींच्या विदेश दौऱ्यासाठी किती खर्च आला?
पंतप्रधान मोदी २०१४मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीच्या ४ वर्ष आणि सात महिन्यात त्यांनी ९२ परदेश दौरे केले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या ९२ परदेश दौऱ्यांच्या देखभालीवर तब्बल २ हजार २१ कोटी रुपयांचा खर्च आला होता, असं तत्कालीन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के सिंग यांनी सांगितलं होतं.
(हे ही वाचा: IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral)
सरकार पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान विमान, चार्टर्ड फ्लाईट्स आणि हॉटलाइन सुविधा यावर खर्च करते. यामध्ये हॉटेल आणि इतर ओव्हरहेड्सच्या खर्चाचा समावेश नसतो. तर पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ ते २०२२ या कार्यकाळातील परदेश दौऱ्यांवरील खर्चाची माहिती मिळू शकलेली नाही.