आपण नेहमीच वृत्तवाहिनीवर तावातावाने होणाऱ्या चर्चा ऐकत असतो. या चर्चांमध्ये अनेकजण आवेशात येऊन एकमेकांशी भांडताना आणि एकमेकांची उणीदुणी काढताना दिसतात. मात्र, ‘आयबीएन-७’ वृत्तवाहिनीवरील रविवारच्या ‘आज का मुद्दा’ या चर्चासत्रादरम्यान घडलेल्या प्रकाराने प्रेक्षकांना भंडावून सोडले. यावेळी दोन कथित धर्मगुरूंमधील शाब्दिक वाद शिगेला पोहचल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने चक्क दुसऱ्याच्या कानशिलात लगावली.
या कार्यक्रमाच्या चर्चेचा विषय सध्या वादात सापडलेली स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ हिच्याशी संबंधित होता. त्यासाठी वृत्तवाहिनीकडून हिंदू महासभेचे ओम जी, ज्योतिषी राखी बाई आणि धर्मगुरू दीपा शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते. चर्चेच्या सुरूवातील ओम जी आणि राखी बाई यांच्यात राधे माँच्या विषयावरून जोरदार वाद सुरू होता. तुम्ही राधे माँ टीका कशी करू शकता, तुम्ही सर्वप्रथम तुमची चूक सुधारली पाहिजे, असे ओम जी तावातावाने सांगत होते. त्याचवेळी दीपा शर्माही राखी बाईंच्या बाजूने चर्चेत उतरल्या आणि दोघींनी मिळून राधे माँचा निषेध करणे सुरूच ठेवले. तेव्हा संतापलेल्या ओम जी यांनी दीपा शर्मा यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यास सुरूवात केली. दीपा शर्माला राधे माँवर टीका करण्याचा आजिबात अधिकार नाही. ती स्वत: ब्लॅकमेलर आहे. तीन वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहत असून त्यालाही ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे दीपा शर्मा यांनी आधी स्वत:ला सुधारावे, असे ओम जी यांनी म्हटले. हा सगळा प्रकार होईपर्यंत दीपा शर्मा शांतपणे चर्चा करत होत्या. मात्र, या प्रकारानंतर त्या अचानक आसनावरून उठल्या. सुरूवातीला टीका सहन न झाल्यामुळे त्या चर्चा सोडून जात आहेत, असा सर्वांचा समज झाला. मात्र, दीपा शर्मा ओम जींच्या दिशेने गेल्या आणि त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दीपा यांनी ओम जींना तोंड सांभाळून बोला असे सांगत त्यांच्या कानशिलात ठेवून देण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे ओम जी सुरूवातीला काहीसे गांगरून गेले. परंतु, त्यांनी लगेचच स्वत:ला सावरत दीपा शर्मांवर प्रतिहल्ला केला. तू मला काय मारणार, असे बोलत ओमजींनी दीपा शर्मा यांना मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर ओम जी आणि शर्मा या दोघांमध्येही एकमेकांचे हात पकडून बराच वेळ बाचाबाची सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2015 रोजी प्रकाशित
वृत्तवाहिनीवरील लाईव्ह चर्चेत धर्मगुरूंमध्ये हाणामारी
आपण नेहमीच वृत्तवाहिनीवर तावातावाने होणाऱ्या चर्चा ऐकत असतो
Written by रोहित धामणस्कर

First published on: 14-09-2015 at 16:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video tv debate on radhe maa turns violent lady slaps godman during live show