Russian Doctors Completes Patient’s Surgery Despite Earthquake: रशियात ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर रशियासह जपानमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशांच्या किनारी भागात त्सुनामीच्या उंच लाटा उसळल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिका देखील याबाबत सतर्क आहे. बुधवारी सकाळी रशियाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील कामचटकामध्ये मोठा भूकंप झाला. रशियन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हा दशकातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. तर, अमेरिकेने हा सहावा सर्वात तीव्र भूकंप असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या भूकंपाचे आणि त्यानंतरच्या त्सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये एक असा व्हिडिओ आहे, ज्याने अनेकांचे मन जिंकले आहे. एक्सवर @RT_Com ने शेअर केलेल्या एका व्हिडिओत रशियात एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असताना भूकंपाचे धक्के बसत असूनही डॉक्टरांनी त्याच्यावरील शस्त्रक्रिया सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यावेळी भूकंपाचे धक्के बसत होते, त्यावेळी त्यांनी सर्वांनी रुग्णाला घट्टपणे पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शक्तिशाली भूकंपाच्या वेळी कामचटकातील डॉक्टर शांत राहिले आणि रुग्णावर सुरू असलेली शस्त्रक्रिया न थांबवता पूर्ण केली. ते शेवटपर्यंत रुग्णासोबत राहिले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.”
जपान, अमेरिकेला इशारा
भूकंपानंतर ज्या भागांना याचा फटका बसला आहे, त्या भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात इमारतींमध्ये जोरदार हादरे बसल्याचे दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये, भूकंपाचा धक्का बसला तेव्हा एका निवासी अपार्टमेंटमधील फर्निचर जोरदार हादरताना दिसत आहे.
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीने रशिया आणि जपानच्या काही किनाऱ्यांवर पुढील तीन तासांत “धोकादायक त्सुनामी लाटा” येण्याचा इशारा देखील जारी केला आहे. अमेरिकेच्या गुआम बेट प्रदेश आणि मायक्रोनेशियाच्या इतर बेटांवर देखील त्सुनामी वॉच लागू करण्यात आला आहे.
भारताला धोका नाही
भूकंपानंतर रशियाच्या कुरिल कोस्टल आयलंड, जपानच्या होक्काइडो आणि अमेरिकेत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने भारतात त्सुनामीच्या धोक्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने म्हटले आहे की, “या भूकंपामुळे भारत आणि हिंदी महासागराला त्सुनामीचा धोका नाही. सुनामी वॉर्निंग सेंटरला ३० जुलै २०२५ रोजी ०४:५४ वाजता कामचात्काच्या पूर्व किनाऱ्यावर ८.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे.”