किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी शनिवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले. ‘ईडी’ची चौकशी टाळण्याची मल्ल्या यांची ही तिसरी वेळ आहे. आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी मे महिन्यापर्यंतची मुदत हवी असे मल्ल्यांनी यावेळी कळवले. आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटींच्या कर्ज गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ‘ईडी’ने मल्ल्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स धाडले होते. बँकाच्या ९००० कोटींच्या कर्ज परतफेडीप्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रकियेचे कारण देत आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्याला सांगितल्याचे माहिती ‘ईडी’च्या सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, मल्ल्या यांनी त्यांच्या वकिलांना ‘ईडी’ला सहकार्य करण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र, आता ईडी मल्ल्यांविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ‘ईडी’च्या तपास अधिकाऱ्यांकडून मल्ल्यांची मे पर्यंतच्या मुदतवाढीची मागणी फेटाळून लावण्यात आली होती. ईडीने मल्ल्यांना गेल्या आठवड्यात ९ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. तत्पूर्वी १८ मार्च आणि २ एप्रिल रोजी बजावण्यात आलेल्या समन्सच्यावेळी मल्ल्या यांनी मुदतवाढ मागितली होती.