कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. मगरीचे अश्रू ढाळू नका असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना खडे बोल सुनावले आहेत. विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन नंतर माफी मागितली होती. तसंच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. मात्र आता विजय शाह यांची माफी मान्य नाही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावलं आहे.

प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात

सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. हा आदेश रद्द करण्याची विनंती विजय शाह यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणी माफी मागितली आहे वगैरे सांगत मगरीचे अश्रू ढाळू नका असं सर्वोच्च न्यायलायने म्हटलं आहे.

न्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले?

शाह यांचे वकील म्हणाले की माझे अशील विजय शाह यांनी माफी मागितली आहे. त्यावर जस्टिस सूर्यकांत म्हणाले ही कुठल्या प्रकारची माफी आहे? तुम्ही एक पब्लिक फिगर आहात. बोलताना शब्द तोलून मापून बोलणं हे तुमचं काम आहे. आम्हाला असल्या माफीची आवश्यकता नाही. आम्ही कायदेशीर कारवाई करु म्हणून तुम्ही माफीनामा दाखवत आहात. आम्ही या प्रकरणी विशेष तपास समिती तयार करण्याचे आदेश देत आहोत. ज्यामध्ये आयपीएस दर्जाचे तीन अधिकारी असतील. हे तिन्ही अधिकारी मध्य प्रदेशच्या बाहेरचे असतील. जे काही विजय शाह बोलले आहेत त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. विशेष तपास समितीने त्यांचा अहवाल २८ मे पर्यंत द्यावा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

विजय शाह यांनी व्यक्त केली दिलगिरी

विजय शाह यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले, “नुकतेच मी जे वक्तव्य केले, त्यामुळे प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळं केवळ मी मनाने मी व्यथितच झालो नाही तर दुःखी देखील झालो आहे. मी माफी मागत आहे.” विजय शाह यांनी सोफिया कुरेशी या देशाच्या भगिनी आहेत असे म्हटले आहे. ते म्हणाले, “त्यांनी राष्ट्र धर्माचे पालन करताना जात आणि समाजाच्या वर जाऊन काम केले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीहून त्या अधिक सन्मानास पात्र आहेत.” असंही म्हटलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मगरीचे अश्रू ढाळू नका म्हणत त्यांना झापलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय शाह काय म्हणाले होते?

मंत्री शाह यांनी एका सभेत बोलताना कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’ असा केला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत देशवासीयांना वेळोवेळी माहिती देणार्‍या कर्नल सोफिया कुरेशी या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावलं आहे.