गुजरातमधील अदानी समुहाच्या ताब्यातील मुंद्रा बंदर वादात सापडलं आहे. आधी जवळपास ३००० किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज तस्करी केल्याचं उघड झाल्यानंतर आणखी एक मोठा खुलासा झालाय. ३ महिन्यांपूर्वी ९ जून रोजी मुंद्रा बंदरावर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात संशयास्पद वस्तूंची आयात करण्यात आली होती. विशेष म्हणजे यानंतर १३ सप्टेंबर रोजी कच्छ बंदरावरुन महसूल गुप्त संचलनालयाला (DRI) २९८८ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडले. याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल २१,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आलीय.

डीआरआय आणि कस्टम विभागावर हलगर्जीपणाचा आरोप

याआधी जूनमध्येही अफगाणिस्तानमधून अशाच प्रकारे आलेली ड्रग्जची खेप आल्यानं डीआरआय आणि कस्टम विभागावर हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. यात DRI आणि Custom चे काही अधिकारी संशयाच्या फेऱ्यात आहेत.

जूनमधील खेप दिल्लीच्या पत्त्यावर पाठवली

डीआरआयच्या माहितीनुसार, हेरॉईनच्या कंटेनरची आयत आंध्र प्रदेशमधील विजयवाड्याच्या आशी नावाच्या कंपनीने केली. या कंपनीने या कंटेनरमध्ये टाल्कम पावडर असल्याचं सांगितलं होतं. अफगाणिस्तानमधील कंधारच्या हसन हुसैन लिमिटेड नावाच्या एका कंपनीने ही निर्यात केली होती. या आयातीच्या चलनावर दिल्लीतील अलीपूरचा रहिवासी कुलदीप सिंहचं नाव होतं. यानंतर डीआरआय आणि कस्टम विभागाने तपास केला असता ती टाल्कम पावडर नसून कोट्यावधींचे ड्रग्ज असल्याचं उघड झालं. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

ड्रग्ज तस्करीप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयने ड्रग्ज आयात करणारे लोक अफगाणिस्तान आणि इराणच्या नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती भूज न्यायालयाला दिली. त्यामुळे हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याचं मानलं जातंय. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आलीय. यातील 4 जण अफगाणी आहेत. दुसरीकडे तपासात ड्रग्जचं वजन आता 3004 किलोग्रॅमपर्यंत पोहचलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८.२१९ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू आहे.

टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तीन स्तर करुन हेरॉईन लपवले

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय डग्ज तस्करी करणाऱ्या या आरोपींनी कागदोपत्री टाल्क स्टोनची वाहतूक करत असल्याचा बनाव केला. मात्र, वास्तवात कंटेनरमधील टाल्क स्टोनचे ३ आवरणं करुन त्याखाली हेरॉईन ड्रग्ज लपवण्यात आलं होतं.

Vijaywada firm import similar consignment in June claiming drugs as talcum powder