गुरुवारी संपूर्ण देशभरात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मध्य प्रदेशातील बेटमा गावातील तरुणांनी मात्र अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानाच्या पत्नीला तरुणांनी नवं घर बांधून देत आभार व्यक्त केले. घर बांधण्यासाठी तरुणांनी लोकांकडून पैसे गोळा करत ११ लाखांची रक्कम जमा केली होती. सीमा सुरक्षा दलाचे जवान मोहन सिंग २७ वर्षांपुर्वी आसाममध्ये शहीद झाले होते. तेव्हापासून त्यांची पत्नी आणि इतर कुटुंब एका जुन्या झोपडीत राहत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन सिंग शहीद झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचे हाल झाले होते. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणीदेखील उभ्या राहिल्या होत्या. डोक्यावर छत नसल्याने संपूर्ण कुटुंब झोपडीत राहत होतं. सरकारनेही त्यांना मदतीचा हात दिला नव्हता. ही परिस्थिती पाहिल्यानंतर गावातील तरुणांनी त्यांच्यासाठी नवं घर बांधण्याचा निर्णय घेतला.

तरुणांनी ‘वन चेक-वन साइन’ या नावाने एक मोहिम सुरु करत आर्थिक मदत उभारण्यास सुरुवात केली. “घर बांधण्यासाठी आम्ही एकूण ११ लाख रुपये जमा केले”, अशी माहिती मोहिमेत सहभागी विशाल राठी याने दिली आहे. “रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आम्ही नव्या घराची चावी त्यांच्या हवाली केली आहे. त्यांनी आम्हाला राखीदेखील बांधील. लवकरच कुटुंब नव्या घरात शिफ्ट होईल”, असंही त्याने सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गृहप्रवेशावेळी तरुणांनी हातघड्या पसरल्या होत्या.

मोहन सिंग शहीद झाले तेव्हा त्यांचा मुलगा तीन वर्षांचा होता. तसंच त्यांची पत्नी गरोदर होती. दोन्ही मुलांनी त्यांनी हालाखीच्या परिस्थितीत वाढवलं. घरासाठी एकूण १० लाख रुपये खर्च करण्यात आले असून, उरलेल्या एक लाखांत मोहन सिंग यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती तरुणांनी दिली आहे. तसंच मोहन सिंग यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेला त्यांचं नाव देण्याचा तरुणांचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village youths built new house for martyrs wife madhya pradesh sgy
First published on: 16-08-2019 at 14:21 IST