रोहित पवार यांना उमेदवारी द्या ते नक्की निवडून येतील अशी मागणी जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या गावकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर हसून रोहित तुझी मागणी झाली बघ असं शरद पवार रोहित पवार यांना म्हटले.
लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील रणधुमाळी संपल्यानंतर शरद पवारांनी राज्याचा दुष्काळी दौरा सुरू केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही आहेत. रोहित पवारांना शरद पवार यांच्यासोबत पाहताच जामखेडच्या काही गावकऱ्यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी जामखेडच्या ग्रामस्थांनी केली.
सध्या जामखेड मतदारसंघात भाजपाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. गावकऱ्यांनी केलेली मागणी शरद पवारांनी मान्य केली तर जामखेडमध्ये कदाचित राम शिंदे विरूद्ध रोहित पवार असा सामना विधानसभेच्या वेळी रंगू शकतो. शरद पवार आणि रोहित पवार हे दोघेही जामखेडमध्ये गेले तेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यावर शरद पवार यांनी दुष्काळ असताना स्वागत कसलं करता? तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा असं शरद पवार यांनी म्हटलं. ज्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार हे अजित पवारांचे चुलत भाऊ राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. राजेंद्र पवार यांचे वडील अप्पासाहेब पवार हे शरद पवारांचे भाऊ आहेत. रोहित पवार हे सध्या बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य म्हणून काम करत आहेत. याच माध्यमातून ते दुष्काळ निवारणाचेही काम करत आहेत.
आता शरद पवार गावकऱ्यांच्या मागणीला मान देणार का? आणि रोहित पवारांना उमेदवारी देणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी त्यांनी मिश्किलपणे रोहित तुझी मागणी झाली बघ असं म्हटलं आहे.