Vinesh Phogat Meet Rahul Gandhi : हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये कडवी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाचे खेळाडू कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्यांच्या भेटीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनाही भेटणार आहेत. तसंच, लवकरच विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Haryana Election: हरियाणामध्ये २०१९ नंतर भाजपाचे विजयी मताधिक्य घटले; यंदा काँग्रेस कडवी लढत देणार?

पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर विनेश फोगट सातत्याने राहुल गांधी यांच्याबरोबर होती. पॅरिसवरून परतल्यानंतर विनेशचं स्वागत करण्याकरता रोहतकचे खासदार दिपेंदर हुड्डा हनुमान गदा घेऊन पोहोचले होते. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधातील विनेशने केलेल्या आंदोलनालाही हुड्डा यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेसच्या अधिक जवळ गेल्याची चर्चा आहे.

विनेश फोगटने हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदर सिंग हुड्डा यांचीही भेट घेतली होती. तसंच, ज्यांना काँग्रेस पक्षात यायचं आहे, त्यांचं पक्षात स्वागत आहे असं हुड्डा यावळी म्हणाले होते. सोमवारी दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हरियाणाचे इनचार्ज दीपक बाबारिया यांनी सांगितलं की, विनेश फोगट विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

काँग्रेस आणि भाजपा एकमेकांचे प्रतिस्पर्धी

सत्ताधारी भाजपाचा काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. २०१९ साली ९० पैकी ७३ मतदारसंघात भाजपानंतर काँग्रेस द्वितीय क्रमाकांचा पक्ष होता. उरलेल्या ११ मतदारसंघात भाजपा काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष होता, ज्याठिकाणी भाजपाचा पराभव झाला. तर जेजेपी पक्ष सहा मतदारसंघात दुसऱ्या स्थानवर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ विधानसभेचे निकाल

२०१९ साली लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर पाचच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये लोकसभेपेक्षा भाजपाची कामगिरी खालावलेली दिसली. काँग्रेसने कडवी टक्कर दिल्यामुळे भाजपाला केवळ ४० जागा जिंकता आल्या. ९० आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी असलेला ४६ चा आकडाही भाजपाला गाठता आला नाही. तर काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या. जेजेपी १० आणि आयएनएलडीला केवळ एक जागा जिंकता आली. स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे जेजेपी पक्ष किंगमेकर ठरला आणि त्यांनी भाजपाशी आघाडी करत सत्ता स्थापन केली.