Vinod Khosla advise for Students : सिलिकॉन व्हॅलीमधील दिग्गज उद्योगपती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) भविष्यातील धोक्यांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या WTF या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खोसला यांनी एआय व तरुणांच्या भविष्यावर सविस्तर मतं मांडली. तसेच ते म्हणाले, “एआय पुढील पाच वर्षांमध्ये ८० टक्के नोकऱ्या नष्ट करेल. मात्र, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधी देखील निर्माण होतील.”

खोसला यांनी यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की “मानव सध्या करत असलेल्या उत्तम आर्थिक लाभ देणाऱ्या कामांपैकी ८० टक्के कामं पुढील पाच वर्षांमध्ये एआयद्वारे केली जातील. मात्र, तंत्रज्ञानाच्या जगात आपण कल्पनाही केली नाही किंवा आपल्या कल्पनेपलिकडच्या नव्या नोकऱ्या निर्माणही होतील. २०४० पर्यंत लोकांना काम करण्याची गरजच भासणार नाही. त्यावेळी लोक घरखर्च भागवण्यासाठी नव्हे तर केवळ आवड म्हणून काम करतील.”

मानवी इतिहासातील सर्वात मोठं संक्रमण

खोसला निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले, “एआयमुळे घडणारे बदल मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संक्रमणापैकी एक असेल. आपण आज ज्या नोकऱ्या पाहतोय त्यापैकी बहुसंख्य नोकऱ्या ऑटोमेट केल्या जातील. परंतु, काम करण्यासाठी एकाच वेळी खूप नव्या गोष्टी उपलब्ध असतील.”

दरम्यान, खोसला यांनी पारंपरिक महाविद्यालयीन पदव्या लवकरच कालबाह्य होतील असं मत नोंदवलं. याचं कारण विषद करत ते म्हणाले, एआय-आधारित शिक्षणपद्धती इतकी प्रगत होतील की त्या सर्वोत्तम मानवी शिक्षकांनाही मागे टाकतील. एआय शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवेल. कायदा, आरोग्य सेवा व वित्तीय सेवा यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांमधील करिअरमध्ये अमूलाग्र बदल घडेल.

शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल होतील : खोसला

विनोद खोसला म्हणाले, “आज आपण जगभर जी शिक्षणव्यवस्था बघतोय तिची जागा एआय घेईल. एआय-आधारित शिक्षक महागड्या शिक्षण संस्था व भरपूर पैसे घेणाऱ्या खासगी ट्युटर्सची (शिक्षक) जागा घेतील. हे एआय आधारित शिक्षक २४ तास आपल्या गरजांनुसार शिक्षण देतील. पारंपरिक वर्ग, शाळा, इमारतींच्या मर्यादा ओलांडून ज्ञानाचं मोठं भांडार खुलं करतील.”