पीटीआय, अमरावती : आंध्र प्रदेशात नवनिर्मित जिल्ह्याच्या नामकरणाच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून सत्तारुढ वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदाराचे घरही निदर्शकांनी पेटवून दिले. निदर्शकांनी पोलिसांच्या वाहनांसह काही बसही पेटवून दिल्याचा समजते. 

राज्य सरकारने कोनासीमा या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली असून त्याचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याविरोधात मंगळवारी अमलपूरम शहरात झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. निदर्शकांनी मम्मीदिवरमचे आमदार पी. सतीश यांच्या निवासस्थानाला आग लावली. त्याचवेळी वाहतूकमंत्री पी. विस्वरूप यांच्या घराबाहेर ठेवलेले फर्निचरही पेटवून देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही निदर्शकांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.