रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीवर भारतीय कर्णधार विराट कोहली फिदा झाला आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील चौथे शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने रोहित शर्मावर कौतुकांचा वर्षाव केला. विराट म्हणाला, ‘रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू आहे.’ सामन्यानंतर रोहित म्हणाला की, विक्रमांकडे मी कधीच पाहत नाही. फक्त सर्वोत्कृष्ट खेळण्याचा प्रयत्न करत असतो.

कोहली म्हणाला की, ‘बांग्लादेश संघाने खरंच चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी आम्हाला चांगली टक्कर दिली. अखेरच्या क्षणांपर्यंत बांग्लादेशच्या संघाने झुंज दिली. आम्हाला विजयासाठी प्रयत्न करायला भाग पाडले. पण भारत उपांत्य फेरीत पोहचल्याचा आनंद आहे. पुढील सामना आणखी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू.’

हार्दिक पांड्याने दबावात उत्कृष्ट गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद करण्याची त्याने यशस्वी रणनिती आखली. ज्यावेळी हार्दिक गोलंदाजीला आला तेव्हा तो फलंदाजाप्रमाणे विचार करत होता. त्यामुळेच हार्दिकला विकेट घेण्यासाठी मदत झाली. हार्दिकने खरेच चांगली गोलंदाजी केली, असेही कोहली म्हणाला.

कोहली म्हणाला की, पाच गोलंदाजांसह खेळण्याची मोठी रिस्क होती. पण छोट्या मैदानामुळे आम्ही हा निर्णय घेतला. पण, प्रत्येक सामन्यात असे करू शकत नाही. रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज आहे. तर बुमराह सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. दोघांच्या प्रदर्शनामुळे मी खूप आनंदात आहे.

सामन्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजा म्हणाला, ‘आम्ही सामना जिंकू शकलो नाही, पण आमच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. विश्वचषक स्पर्धाही आमची चांगली गेली आहे. मुस्तफिजूर आणि शाकिबने या स्पर्धेत आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.