Putin To Meet Zelenskyy: दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युक्रेन-रशिया संघर्षावर अखेत तोडगा निघण्याच्या दृष्टीने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे. पुतिन आणि ट्रम्प यांच्या अलास्कामधील भेटीनंतर काल अमेरिकेत ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट झाली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प आणि झेलेन्स्की हास्यविनोद करताना दिसले. आता युरोपियन युनियन नेत्यांच्या मते, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि झेलेन्स्की यांची लवकरच भेट होऊ शकते. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही ही भेट घडवून आणणार असल्याचे म्हटले आहे.

झेलेन्स्की यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते पुतिन आणि झेलेन्स्की यांची लवकरच भेट घडवून आणणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी फोनद्वारे पुतिन यांना याची माहिती दिली.

ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर पोस्टद्वारे सदर माहिती दिली. ते म्हणाले, आमची बैठक झाल्यानंतर मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन केला आणि युक्रेन व रशियाच्या नेत्यांची बैठक होईल, याबाबतची बोलणी सुरू केली. तसेच ट्रम्प पुढे म्हणाले की, ते स्वतः युक्रेन आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय शिखर परिषद घेतील.

trump post for putin zelensky meeting
ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावर केलेली पोस्ट

रशिया आणि युक्रेनमधील शांतता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वजन आनंदी आहेत, असे ट्रम्प यांनी लिहिले.

"डोनाल्ड ट्रम्प यांच्यात रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याची ताकद", पुतिन-ट्रम्प भेटीनंतर झेलेन्स्कींचं मोठं विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
“डोनाल्ड ट्रम्प यांच्यात रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याची ताकद”, पुतिन-ट्रम्प भेटीनंतर झेलेन्स्कींचं मोठं विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या भेटीनंतर युरोपियन नेत्यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की, पुतिन यांनी पुढील दोन आठवड्यांत झेलेन्स्की यांना भेटण्यास सहमती दर्शवली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही पुतिन यांची भेट घेण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. रशियाने चर्चेची तयारी दर्शविल्याचे स्वागत केल्यानंतर ट्रम्प यांच्या मध्यस्थीने त्रिस्तरीय बैठक झाल्यास आनंदच होईल, असेही झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, “बैठकीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. आम्ही फक्त भेट घेण्यावर सहमती दर्शवली आहे.”