व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर पुतिन यांनी सलग पाचव्यांदा रशियाची सूत्रं हाती घेतली आहेत. पाचव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होताच पुतिन यांनी पश्चिमेकडील राष्ट्रांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुतिन म्हणाले, “रशिया-नाटो संघर्ष तिसऱ्या महायुद्धापासून केवळ एक पाऊल दूर आहे.” १९६२ च्या क्युबामधील संकटानंतर रशिया-युक्रेन युद्धाने पश्चात्य राष्ट्रे आणि रशियाचे संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, पुतिन यांनी म्हटलं आहे की, युक्रेनवर आण्वस्र हल्ला करणं कधीच गरजेचं वाटलं नाही.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती येताच पुतिन यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पुतिन म्हणाले, “भविष्यात रशिया आणि नाटोत मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” टीएएसएसने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन म्हणाले की, ‘मला वाटतं आधुनिक जगात काहीही होऊ शकतं. परंतु, हे सगळं तिसऱ्या महायुद्धापासून एक पाऊल मागे असेल आणि मला नाही वाटत की यामध्ये कोणाला रस असेल.” युक्रेनने रशियात १५ ते १७ मार्च दरम्यान होणाऱ्या निवडणुकांपूर्वी रशियावरील हल्ले वाढवले होते. तसेच रशियाच्या सीमेवरील फौजफाटा वाढवला होता. त्यास रशियानेही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उभय देशांच्या सीमेवरील परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, शुक्रवारी (१५ मार्च) सुरु झालेलं मतदान तीन दिवस चाललं. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी ८८ टक्के मतं मिळवत विजय साकार केला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं होतं. आता पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत.
हे ही वाचा >> “कोणीतरी आमच्या कार्यालयात लिफाफा ठेवलेला, त्यामध्ये…”, निवडणूक रोख्यांबाबत जेडीयूचं EC समोर स्पष्टीकरण
निवडणूक निष्पक्ष नव्हती; अमेरिकेचा आरोप
पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली होती. जी निवडणूक झाली ती निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असं अमेरिकेने म्हटलं आहे. मात्र आता पुतिन यांच्या विजयानंतर त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. या विजयामुळे पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या दोनशे वर्षात दीर्घकाळासाठी राष्ट्राध्यक्ष राहण्याचा रेकॉर्ड हा पुतिन यांच्या नावे झाला आहे.