पीटीआय, पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मंगळवारी १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात काही मंत्र्यांसह एकूण १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ३.७ कोटी मतदार ठरवणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून चार लाखांपेक्षा अधिक सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बिहारची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह विरोधी महागठबंधनसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. त्यामुळे ती अतिशय अटीतटीने लढवली गेली. बिहारमधील जातीची समीकरणे गुंतागुंतीची समजली जातात. वेगवेगळे जातसमूह आणि समाज गट यांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये विविध आश्वासने दिली.

राज्यात गेले महिनाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तसेच जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी प्रामुख्याने प्रचारात सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका आणि आरोप केल्याचे दिसून आले.

सीमांचलमध्ये घुसखोरीचा मुद्दा

मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अरारिया आणि किशनगंज या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. हे सर्व जिल्हे नेपाळच्या सीमेला लागून आहेत, तसेच यातील बहुसंख्य जिल्हे मुस्लीमबहुल सीमांचलचा भाग असल्याने विशेषतः भाजपने घुसखोरीचा मुद्दा लावून धरला.

मतदारांची वैशिष्ट्ये

– ४५,३९९ मतदान केंद्रावर मतदान

– ४०,०७३ मतदारसंघ ग्रामीण भागात

– ३० ते ६० वर्षे वयोगटात २.२८ कोटी मतदार

– १८ ते १९ वर्षे वयोगटात ७.६९ लाख मतदार

– १२२ मतदारसंघांमध्ये एकूण १.७५ कोटी महिला मतदार