एअर मार्शल व्हीआर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख; राफेल विमानांच्या खरेदीत बजावली होती महत्त्वाची भूमिका

विवेक राम चौधरी यांना विविध लढाऊ विमानांवर ३८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

Vr chaudhari appointed iaf new chief of air staff
एअर मार्शल व्हीआर चौधरी (फोटो सौजन्य- Twitter/@SpokespersonMoD)

एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील.भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील. हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.

चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पदवीधर देखील आहेत. एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर १ जुलै २०२१ रोजी ते हवाई दलाचे ४५ वे उपप्रमुख झाले. ३० सप्टेंबर २०२१ रोजी एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते हवाई दलाचे २७ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) म्हणूनही काम केले आहे.

विवेक राम चौधरी यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने हाताळण्यात प्राविण्य मिळवले आहे. ते हवाई दलाच्या काही महत्त्वाच्या मोहिमांचा भाग राहिले आहेत. ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन सफेद सागरमध्ये देखील सहभागी होते.

३७ वर्षांपूर्वी झालेले ऑपरेशन मेघदूत भारतीय सशस्त्र दलाचे यशस्वी ऑपरेशन होते. यामुळे काश्मीरमधील सियाचीन ग्लेशियरवर भारतीय लष्कराने पूर्ण नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडले गेले. १३ एप्रिल १९८४ रोजी सकाळी ही मोहीम राबवण्यात आली. हवाई दलाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. चौधरी या ऑपरेशनचा एक भाग होते.

चौधरी यांना २९ डिसेंबर १९८२ रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. ते एक पात्र उड्डाण प्रशिक्षक आहे. त्यांना मिग -२१, मिग -२३ एमएफ, मिग -२९ आणि सुखोई -३० एमकेआय यासह विविध लढाऊ विमानांवर ३८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vr chaudhari appointed iaf new chief of air staff abn