मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमसाठी पुढील दोन वर्षांत १६ लाखांहून अधिक व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपीएटीचा वापर केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने व्हीव्हीपीएटीची निर्मिती करणाऱ्या ईसीआयएल आणि बीईएलला यासंबंधीत पत्र पाठवले आहे. ही यंत्रे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांत खरेदी केली जाणार आहेत, असे पत्राद्वारे सांगितले आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत दोघांकडून प्रत्येकी आठ लाख ७५०० व्हीव्हीपीएटी यंत्रे खरेदी करण्यात येतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. व्हीव्हीपीएटीचा वापर केल्याने मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडण्यास मदत होईल. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे मतदारांचा निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढेल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केला. या यंत्रांची निर्मिती ईसीआयएल आणि बीईएलतर्फे करण्यात येणार आहे. या यंत्रांची निर्मिती आयोगाने मंजूर केलेल्या डिझाइननुसारच केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच व्हीव्हीपीएटी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी त्याच्या निर्मितीवर निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे. व्हीव्हीपीएटी तयार करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांना किमान ३० महिन्यांचा कालावधी लागेल, असेही आयोगाने स्पष्ट केले. दरम्यान, नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारने ३, ७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vvpat machines election commission issues letter purchase in two years
First published on: 23-04-2017 at 17:31 IST