Israel plot to kill Ayatollah Khamenei: इराण आणि इस्रायलमध्ये चाललेला १२ दिवसांचा सशस्त्र संघर्ष थांबल्यानंतर आता इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना मारण्याची योजना आखल्याचे कबूल केले आहे. मात्र आयत्यावेळेला खोमेनी भूमिगत झाल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा मिळू शकला नाही, असेही ते म्हणाले.
जर खोमेनींचा ठावठिकाणा मिळाला असता तर आम्ही त्यांना निश्चितच बाहेर येण्यास भाग पाडले असते, अशी माहिती काट्झ यांनी कान पब्लिक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिली. इराणचे सर्वोच्च नेते अतिशय चलाखीने अज्ञात स्थळी भूमिगत झाले होते. तसेच त्यांनी आपल्या कमांडर्सशीही संपर्क तोडला होता. ज्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे शक्य झाले नाही, असेही काट्झ म्हणाले.
टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काट्झ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, १२ दिवस चाललेल्या संघर्षादरम्यान आम्ही खोमेनींचा खूप शोध घेतला. आमचे ध्येय इराणमधील राजवट बदलणे नव्हते, तर इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट होते.
इराणचे अणुसंशोधन थांबविणे हाच सशस्त्र संघर्चाचा उद्देश असल्याचे इस्रायलने आतापर्यंत सांगितले होते. मात्र आता संरक्षण मंत्र्यांनीच इराणच्या सर्वोच्च नेत्यांना संपविण्याची योजना आखल्याचे कबूल केले आहे.
१३ जून रोजी इराण आणि इस्रायल यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाला होता. २५ जून रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम घडून आला. दरम्यान इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे वरिष्ठ कमांडर आणि अणु वैज्ञानिक मारले गेले. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ला केला. तसेच या हल्ल्यामुळे इराणचा अणु आणि क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम अनेक वर्ष मागे ढकलला.
अमेरिकेची परवानगी मागितली होती?
खोमेनींना ठार करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेची परवानगी मागितली होती का? असे विचारले असता काट्झ यांनी चॅनेल १३ ला सांगितले की, या गोष्टींसाठी आम्हाला परवानगीची आवश्यकता नाही. काट्झ यांनी खोमेनी यांची तुलना हेजबोलाचे नेते हसन नसरल्लाह यांच्याशी केली. मागच्या वर्षी हसन नसरल्लाह इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले.