पीटीआय, न्यूयॉर्क

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती आणि कट्टर उजव्या विचारसरणीचे चार्ली कर्क यांच्या हत्येमागील हेतू स्पष्ट झाला नसला तरी ही राजकीय हत्या असल्याचे सांगितले जात आहे. यूटाचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी ही ‘राजकीय हत्या’ असल्याची प्रतिक्रिया दिली.

यूटाचे माजी खासदार जेसन चॅफत्झ हे कर्क यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, ‘त्यांच्यावर जवळून गोळीबार केल्यासारखे वाटले. पोलिसांचा बंदोबस्त किरकोळ होता. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. यूटा हे सुरक्षित ठिकाण मानले जाते. अशा घटना यापूर्वी येथे झालेल्या नाहीत.’

यूटा येथील व्हॅले विद्यापीठ परिसरात कर्क यांच्या संस्थेद्वारे आयोजित एका कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे, घटना घडली, त्या वेळी ते सामूहिक गोळीबार आणि बंदुकीद्वारे होणारा हिंसाचार यावर प्रेक्षकांतून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. ‘गेल्या १० वर्षांत किती अमेरिकी तृतीयपंथी सामूहिकरीत्या गोळीबार करून खुनी बनले आहेत,’ असा प्रश्न उपस्थितांतून विचारण्यात आला होता. त्यावर कर्क यांनी ‘अनेक…’ असे उत्तर दिले. त्यावर समोरच्याने आणखी एक प्रश्न विचारला आणि त्याच वेळी गोळी झाडण्याचा आवाज आला.

कर्क यांची मोहीम लक्ष्य

कर्क यांच्या ‘द अमेरिकन कमबॅक टूर’ या मोहिमेला लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या मोहिमेमुळे ध्रुवीकरणाला चालना मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठ परिसरातून यापूर्वी व्यक्त झाल्या होत्या. कर्क यांना विद्यापीठ परिसरात बंदी घालावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर हजारांहून अधिक जणांनी सह्या केल्या होत्या. विद्यापीठाने गेल्या आठवड्यात या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सकारात्मक संवादाचा हक्क अबाधित ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे विद्यापीठाने सांगितले होते. यूटा येथील महाविद्यालयात भेट देण्यावरून वाद झाल्याची छायाचित्रे कर्क यांनी ‘एक्स’वर टाकली होती.

‘टर्निंग पॉइंट’ संस्थेद्वारे प्रसिद्धी

कर्क १८ वर्षांचे असताना त्यांनी शिकागो येथे २०१२ मध्ये ‘टर्निंग पॉइंट’ या संस्थेची स्थापना केली होती. कमी कर आणि मर्यादित सरकारी व्यवस्थेवर महाविद्यालयीन तरुणांत मतपरिवर्तन करण्याचा संस्थेचा निर्धार होता. मात्र, त्यात त्यांना सुरुवातीला यश आले नाही. मात्र, कर्क यांनी महाविद्यालय परिसरात उदारमतवाद्यांचा सामना करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळू लागली. २०१६ मध्ये ट्रम्प यांची अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांना या संस्थेने पाठिंबा दर्शवला. निवडणूक प्रचारामध्ये ट्रम्प यांच्या सर्वांत मोठ्या मुलाचे वैयक्तिक सहायक म्हणूनही कर्क यांनी काम केले. ‘टर्निंग पॉइंट’ संस्थेच्या विविध कार्यक्रमांत ट्रम्प आणि त्यांचा मोठा मुलगा बऱ्याचदा उपस्थित राहत असत.

हा राज्यासाठी अतिशय काळा दिवस आहे. ही राजकीय हत्या आहे. या गोळीबारासंदर्भात कुणालाही काहीही माहिती असल्यास ती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. – स्पेन्सर कॉक्स, गव्हर्नर, यूटा

यापूर्वीच्या घटना

● मिनेसोटा राज्याच्या लोकप्रतिनिधी मिलेसा हॉर्टमन यांची त्यांच्या पतीसह जून महिन्यात हत्या.

● कोलोरॅडो येथे जून महिन्यात इस्रायलच्या समर्थकांवर हल्ला.

● एप्रिल महिन्यात पेनसिल्व्हानियाच्या ज्यू गव्हर्नरचे घर पेटवले.

● ट्रम्प अध्यक्ष होण्यापूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर झालेला हल्ला.