Operation Sindoor Success Reasons: हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी शनिवारी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय केंद्र सरकारच्या “राजकीय इच्छाशक्ती” ला दिले, ज्यामुळे भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही निर्बंधाशिवाय ऑपरेशन्स करता आले. बंगळुरूमधील एचएएल मॅनेजमेंट अकादमीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, भारतीय हवाई दल प्रमुखांनी यावर भर दिला की, सशस्त्र दलांवर “कोणतेही निर्बंध” नाहीत.
यशाचे एक प्रमुख कारण…
“यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती होते. आम्हाला अतिशय स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आमच्यावर कोणतेही बंधने लादण्यात आली नव्हती. जी काही बंधने होती ती स्वतःहून तयार केली होती. युद्धाचे नियम काय असतील हे सैन्याने ठरवले. आम्हाला वाढत्या तणावावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आम्ही ठरवले. आम्हाला योजना आखण्याचे आणि अंमलबजावणी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते”, असे एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की संरक्षण प्रमुख (सीडीएस) यांनी तिन्ही सशस्त्र दलांना लष्कर, नौदल आणि हवाई दल एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी कसे संघटित केले.
“तिन्ही दलांमध्ये एक समन्वय निर्माण झाला. सीडीएसच्या पदामुळे खरोखरच फरक पडला. ते आम्हाला एकत्र आणण्यासाठी होते. सर्व सुरक्षा संस्थांना एकत्र आणण्यात एनएसएनेही मोठी भूमिका बजावली”, असे ते म्हणाले.
राहुल गांधींचे आरोप
यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान भारत सरकारच्या “राजकीय इच्छाशक्ती”वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
“तुम्ही पाकिस्तानला नेमके काय कराणार आहे ते सांगितले. तुम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लष्करी लक्ष्यांवर हल्ला करणार नाही, तुम्ही त्यांना सांगितले की आम्हाला तणाव वाढवायचा नाही. याचा अर्थ तुम्ही पाकिस्तानला थेट सांगितले आहे की, तुमच्याकडे लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही”, असे राहुल गांधी म्हणाले होते.
संरक्षण प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचे इंडोनेशियातील आणि संरक्षण अटॅचे कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, भारताने आपले लढाऊ विमान गमावले कारण सशस्त्र दल “राजकीय नेतृत्वामुळे अडचणीत होते.”
ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्करी प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.