धुके आणि धुराच्या मिश्रणामुळे निर्माण होणाऱ्या धुरक्यामुळे दिल्ली आणि परिसरातील नागरिक त्रस्त झाले असतानाच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर या धुरक्यामुळे विचित्र अपघात झाला. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.
उत्तर भारतामध्ये बुधवारची पहाटही गडद धुक्यामध्ये उजाडली असून दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. तर दुसरीकडे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील शेतकरी खरीप हंगामापूर्वीत शेतीतील कचरा जाळत असल्याने धूराचे प्रमाण वाढले. यामुळे दिल्ली आणि एनसीआर पट्ट्यातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
धूरक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून यामुळे बुधवारी सकाळी आग्रा – नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवर विचित्र अपघात झाला. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिली असून यात १२ जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.यमुना एक्स्प्रेसवेवरील अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली आणि परिसरातील वाहनचालकांनी वाहन चालवताना सतर्क राहावे आणि अतिवेगाने वाहन पळवू नये, असे आवाहनही केले जात आहे.
Uttar Pradesh: Ten vehicles collide on Yamuna Expressway in Gautam Buddha Nagar's Dankaur due to thick fog, several people injured. pic.twitter.com/4XtC6M8OcU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 8, 2017
राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी एका याचिकेवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. आपातकालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना सरकारने त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज होती, असे त्यांनी म्हटले होते. दुसरीकडे दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण वाढल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली. सलग दुसऱ्या दिवशी धुरक्यामुळे दिल्लीतील नागरिक त्रस्त झाले असून यामुळे श्वसनाचे आजार वाढू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.