गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांना आता पाण्यापासून बचाव करणाऱ्या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे लष्कर चीनविरोधात तैनात आहे त्यांना आता हे पोशाख मिळणं अत्यावश्यक वाटू लागलं आहे. गलवान नदीचे पाणी अत्यंत थंड आहे. अशात चिनी सैनिकांनी वॉटरप्रुफ पोशाखाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ते तिथे उभं राहू शकतात. आता भारतीय सैनिकांनाही विशिष्ट पोशाखांची गरज निर्माण झाली आहे.

“सध्याच्या घडीला बर्फासारख्या थंड पाण्यापासून आमचा बचाव होऊ शकेल अशा विशेष पोशाखांची आम्हाला गरज आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे त्यामुळे चीन विरोधात उभं राहायचं असेल तर आम्हाला विशेष पोशाखांची नितांत गरज आहे” असं भारतीय लष्कराने म्हटल्याची माहिती काही खास सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

चीनच्या सैनिकांनी त्यांचे तळ गलवान नदीच्या आणि खोऱ्याच्या ज्या भागांमध्ये तयार केले आहेत त्यांच्याकडे थंड पाण्यापासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख आहेत. अशा पोशाखामुळे ते थंडगार पाण्यातही उभे राहू शकत आहेत. इंडियन पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ जेव्हा त्यांचे काही सैनिक आले होते तेव्हा ही बाब समजली असंही ANI ने दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ जेव्हा काही भारतीय सैनिक नदीत उतरले होते तेव्हा त्यांचे बूट ओले झाले होते. १५ जूनला जी चकमक उडाली त्यावेळीही चीनच्या सैनिकांकडे विशेष पोशाख होता म्हणून त्यांचा वातावरणातल्या बदलांपासून बचाव झाला. तसंच हायपोथर्मियापासून त्यांचा बचाव होऊ शकला. हायपोथर्मिया झाल्यास शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते आणि शरीर थंड पडू लागते. सामान्यतः शरीराचं तापमान ३७ डिग्री सेल्सियस असतं मात्र थंड वातावरणात ते कमी होतं. अशात हायपोथर्मिया झाल्यास ते आणखी कमी होऊ शकतं. यामुळे झोप येणं, अस्वस्थ वाटणं गोंधळात पडणं हे बदल शरीरात होऊ शकतात. चिनी सैनिकांकडे विशिष्ट पोशाख असल्याने हायपोथर्मिया होण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही भारतीय लष्कराने म्हटलं आहे.