देशभरात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करता, आम्ही येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये कपात करण्याच्या पर्यायावर विचार करत आहोत. असं पोखरियाल यांनी सांगितलं आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या व परिक्षांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच पोखरियाल यांनी १५ ऑगस्ट नंतर शाळा सुरू होतील असे संकेत दिलेले आहेत. असे जरी असले तरी सर्व काही त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.

या अगोदर शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यांच्या शिक्षण सचिवांनी विद्यार्थांचे आरोग्य व सुरक्षा, शाळांमधील स्वच्छता संबंधी उपाय आणि ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाशी निगडीत मुद्यांवर सोमवारी चर्चा केली होती. यानंतर केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केले होते. शालेय शिक्षणासंबंधी मुद्यांवर राज्य सरकारांकडून महत्वाच्या सूचना मिळाल्या आहेत. आमची प्राथमिकता विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा हीच आहे. प्राप्त झालेल्या सूचनांवर निश्चित विचार केला जाईल. शिवाय, या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, गृहमंत्रालय यांच्याकडेही पाठवल्या जातील असे ते म्हणाले होते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाउनचा पाचवा टप्पा एक जूनपासून सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक सेवा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी ठेवत परवानगी देण्यात आली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are contemplating the option of reduction in the syllabus and instructional hours for the coming academic year ramesh pokhriyal msr
First published on: 09-06-2020 at 14:21 IST