Two Brothers one Wife: हिमाचल प्रदेशात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथील दोन सख्ख्या भावांनी एकाच महिलेशी लग्न केले आहे. सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले होते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतरांगामध्ये आजही बहुपत्नीत्वाची प्रथा पाळली जाते. त्याच प्रथेनुसार हे लग्न पार पडल्याचे सांगितले जाते.

प्रदीप आणि कपिल नेगी या दोन भावंडांनी सुनीता चौहानशी लग्न केले आहे. परस्पर संमतीने आणि कोणत्याही दबावाविना हे लग्न केल्याची प्रतिक्रिया नेगी बंधूंनी दिली. तसेच आम्हाला याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले. आमची परंपरा पुढे नेण्याचा हा आमचा संयुक्त निर्णय होता, असेही दोघे भाऊ म्हणाले.

१२ जुलै रोजी या लग्नाला सुरुवात झाली. तब्बल तीन दिवस लग्नाच्या विधी सुरू होत्या. यासाठी शेकडो नातेवाईकांनी लग्नाला उपस्थिती लावली. स्थानिक लोकगीते, नृत्ये सादर करत लोकांनी या समारंभात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याच जिल्ह्यातील कुन्हाट गावातील रहिवासी असलेल्या सुनीता चौहान म्हणाल्या की, त्यांना या परंपरेची जाणीव होती. तिने स्वतःच्या इच्छेने हे लग्न केले.

हिमाचल प्रदेशमध्ये बहुपत्नीत्वाला मान्यता

हिमाचल प्रदेशमधील महसूल कायद्यांनुसार अशा लग्नांना ‘जोडीदारा’ या शब्दाखाली मान्यता दिली जाते. जिल्ह्यातील बढाना गावात याच पद्धतीने गेल्या सहा वर्षांत पाच लग्न झालेली आहेत, असे वृत्त पीटीआयने दिलेले आहे. २०२२ मध्ये हत्ती समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे. हा समुदाय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सीमेवरील पर्वतरांगामध्ये राहतो.

वाढती साक्षरता, सामाजिक बदल आणि आर्थिक विकासामुळे गेल्या काही वर्षांत या प्रथेचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही या प्रदेशात ही प्रथा अस्तित्वात आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, सध्या अशा लग्नाचे प्रमाण कमी झाले असले तरी अधिक गाजावाजा न करता काही भागात गुपचूप अशी लग्न होत आहेत.

हट्टी समाजाची लोकसंख्या किती?

हिमाचल आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या ट्रान्स-गिरी प्रदेशातील सुमारे ४५० गावांमध्ये हट्टी समुदायाचे अंदाजे तीन लाख लोक आहेत. उत्तराखंडच्या जौनसर बाबर आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर यासारख्या शेजारच्या आदिवासी भागातही अशाच परंपरा पाळल्या जात होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय हट्टी समितीचे सरचिटणीस कुंदन सिंह शास्त्री म्हणाले की, दुर्गम डोंगराळ प्रदेशात सामाजिक-आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी हजारो वर्षांपासून ही प्रथा विकसित झाली. जर कुटुंब मोठे असेल आणि त्यात जास्त पुरुष असतील तर आदिवासी समुदायात राहताना सुरक्षेचे वातावरण तयार होते. तसेच विस्तीर्ण शेतजमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि दीर्घकाळ ती कुटुंबाच्या ताब्यात राहण्यासाठी अशा प्रकारची प्रथा उपयोगी होती.