मेटाकुटीला आलेल्या अफगाण विद्यार्थ्यांची दिल्लीतील परिचितांकडे विचारणा

नवी दिल्ली : अफगाणींना भारतात येण्यासाठी परराष्ट्र खात्याने ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी, काबूलमधील विमानतळ बंद झाल्यामुळे अडकून पडलेले अनेक अफगाणी विद्यार्थी दिल्लीतील परिचितांशी फोन वा मेलवरून संपर्क साधत असून ‘भारतात कसे परत येऊ’, अशी मेटाकुटीला येऊन विचारणा करत आहेत.

दिल्लीतील ‘इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स’च्या (आयसीडब्ल्यूए) संशोधन शिष्यवृत्तीधारक (रिसर्च फेलो), डॉ. अन्वेषा घोष या सुमारे ६० अफगाण विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘आयसीडब्ल्यूए’चे आंतरराष्ट्रीय संशोधन होते. घोष वैयक्तिक स्तरावर काही अफगाण विद्यार्थ्यांना परराष्ट्र खात्याच्या निर्णयांची माहिती देऊन मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘माझ्याशी ज्या अफगाण विद्यार्थ्यांनी संपर्क साधला, त्यापैकी अनेकांनी आंतरराष्ट्रीय संस्थांशी, विविध देशांच्या सरकारांबरोबर काम केले आहे. भारतात शिक्षण घेतलेल्या, कुठल्या ना कुठल्या मार्गाने भारताशी संबंध असलेल्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जात आहे. भारतात येऊन गेलेले हे सगळे विद्यार्थी घाबरलेले आहेत. इतक्या लवकर परिस्थिती बिघडेल असे त्यांना वाटलेच नव्हते’, असे अन्वेषा घोष म्हणाल्या. ‘माझ्याकडे भारतात येण्यासाठी शैक्षणिक व्हिसा आहे पण, विमानतळावर अडकून पडलो आहे. अफगाणिस्तान सोडले नाही तर आमचे आयुष्य संपले’, असे भारतात शिकणाऱ्या पण, करोनामुळे मायदेशी गेलेल्या विद्याथ्र्याने घोष यांना काबूल विमानतळावरून सांगितले.

एका विद्यार्थिनीचे पारपत्र भारतीय दूतावासाकडे होते. दूतावासाने व्हिसा प्रक्रियेचे काम स्थानिक खासगी कंपनीला दिलेले आहे. दोन दिवसांपूर्वी तालिबानींनी या कंपनीचे कार्यालय बंद केले. त्यामुळे पारपत्र नाही आणि व्हिसाही नाही अशा कोंडीत या विद्यार्थिनीला काबूलमध्ये थांबावे लागले आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये अनेकांनी व्हिसासाठी या कंपनीकडे अर्ज केले होते, कागदपत्रे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे होती. आता कर्मचारीही नाहीत आणि कागदही मिळण्याची शक्यता नाही. योग्य कागदपत्रांविना भारतीय दूतावासही या अफगाणींना ई-व्हिसा देऊ शकत नाही, असे घोष यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे सैनिक शेवटची आशा

अमेरिकेचे सरकार त्यांच्या नागरिकांना बाहेर काढत असल्यामुळे अजूनही काबूल विमानतळावर त्यांचे सैनिक तैनात आहेत, अफगाण विद्यार्थ्यांसाठी हे सैनिक शेवटची आशा आहेत. अमेरिकेची ही मोहीम पूर्ण होण्याआधी कसेही करून बाहेर पडता आले तरच अफगाणिस्तान सोडता येईल. अमेरिकेने पूर्णत: गाशा गुंडाळला तर आयुष्य संपले अशा भावना या विद्यार्थ्यांनी घोष यांच्याकडे बोलून दाखवल्या. भारताने ई-व्हिसा देण्याचा निर्णय घेतला असला तरी, तेथील परिस्थिती इतकी स्फोटक आहे की, या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल परराष्ट्र मंत्रालयातही स्पष्टता नाही. शिवाय, देशाची सुरक्षा हा ई-व्हिसा मंजूर करण्यातील सर्वात मोठी चिंता आणि अडचण मंत्रालयासमोर असल्याचे घोष म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका

पुणे, अहमदाबाद, बंगळूरु, हैदराबाद, दिल्ली या वेगवेगळ्या शहरांमधील विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीधारक अफगाण विद्यार्थी शिकतात. करोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने अनेक अफगाणिस्तानला गेले आहेत. काही विद्यार्थी मजार-ए-शरीफ, हैरात या शहरांतील आहेत, ते आता काबूलमध्ये आलेले आहेत. तालिबानींना काबूलचा ताबा घ्यायला वेळ लागेल, तोपर्यंत भारतात पोहोचता येईल असे त्यांना वाटले होते. पण काही तासांत काबूल हातातून गेले. हे विद्यार्थी पश्तुनेतर ताजिक, हजारा वांशिक असल्याने त्यांच्या जिवाला अधिक धोका असल्याचे घोष यांनी सांगितले.