करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आज सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भातील चिंता व्यक्त केली. करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकारने काय तयारी केली आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर्स आणि परिचारिकांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्राने त्यासंदर्भातही नियोजन करावं असं म्हटलं आहे. येणारी तिसरी लाट पाहून त्यासंदर्भातील धोरणे आखावीत असा सल्ला न्यायालयाने केंद्राला दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणीदरम्यान तिसऱ्या लाटेसंदर्भात चिंता व्यक्त केली. या सुनावणीदरम्यान न्या. डी. व्हाय. चंद्रचूड यांनी, सरकारचे वैज्ञानिकच तिसरी लाट येईल असं म्हणत आहेत तर सरकारने यासंदर्भात काय तयारी केली आहे?, असा प्रश्न केंद्राला विचारला आहे. तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग झाला तर पालकांनी काय करावं, असा प्रश्ननही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्या. चंद्रचूड यांनी, आता आपण दुसऱ्या लाटेत आहोत. तिसरी लाटही येणार आहे. त्यासंदर्भात केंद्राने काय तयारी केलीय? तेव्हाची आव्हाने वेगळी असतील. त्यासाठी आपण सध्या काय करत आहोत?, असे प्रश्न केंद्राला विचारले. खंडपीठातील दुसरे न्यायाधीश न्या. एम. आर. शाह यांनी इथे तर आपण फक्त दिल्लीबद्दल बोलत आहोत. मात्र भारतातील बहुतांश लोक ही खेड्यांमध्ये राहतात. दूर्गम भागातील परिसरासंदर्भात काय नियोजन आहे. भविष्यातील तयारी कशी सुरु आहे. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसं काम करणार आहात? तुम्ही इथे ऑक्सिजन घेऊन जायला कंटेनर नसल्याचं सांगताय तर भविष्यात कसं काम करणार?

न्या. चंद्रचूड यांनी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा संदर्भ देत, यामध्ये तर लहान मुलांना संसर्ग झाला तर त्यांचे आई-वडील का करणार?, हे पालक त्यांच्या मुलांसोबत रुग्णालयांमध्ये थांबणार की काय करणार?, सरकारने काय नियोजन केलं आहे? लहान मुलांच्या लसीकरणाचा काय विचार केला आहे?, असे प्रश्न केंद्राला विचारले. यावर उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च स्तरीय बैठकांमध्ये निर्णय घेत जात असल्याचं सांगत काही निर्णयांवर पुन्हा विचार केला जात असल्याचं न्यायालयाला सांगितलं. आम्ही ऑक्सिजनचे टँकर्स पुरवत आहोत. केंद्र सरकार एखाद्या रुग्णालयाप्रमाणे काम करणाऱ्या ट्रेन्सही तयार करत आहेत. या ट्रेन दुर्गम भागात जाऊन रुग्णांना सेवा देतील. याबद्दल विचार सुरु आहे, असं मेहता यांनी सांगितलं.

आपण तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येणाऱ्या डॉक्टरांची टीम तयार करू शकतो का? दुसरी लाट हाताळण्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ नाही. तिसर्‍या लाटेसाठीही मनुष्यबळ नाही. आपण त्यात फ्रेश ग्रॅज्युएट डॉक्टर आणि नर्स वापरु शकतो का? तिसर्‍या लाटेत डॉक्टर आणि परिचारिका थकलेल्या असतील. तेव्हा काय करणार? काही बॅकअप तयार करावा लागेल, असंही न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We need to prepare for third wave of covid 19 children will be affected scientific planning needed supreme court scsg
First published on: 06-05-2021 at 16:11 IST