West Arctica Embassy In Ghaziabad: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काही लोकांनी मिळून बनावट दूतावास उभारला आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने हे रॅकेट उघडकीस आणले आहे. एसटीएफने या प्रकरणात एका आरोपीला अटकही केली आहे. आरोपीचे नाव हर्षवर्धन जैन असे आहे. हर्षवर्धन गाझियाबादच्या कविनगरमध्ये भाड्याने घेतलेल्या घरात बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक या देशाचा दूतावास चालवत होता.
दरम्यान, पोलीस तपासात असे समोर आले की, आरोपी स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोरा, पॉलिया, लोडोनिया सारख्या देशांचा कॉन्सुल/राजदूत असल्याचे सांगायचे. याचबरोबर, राजनैतिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करायचे. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही अशी देशांची नावे आहेत जी कुठेही अस्तित्वात नाहीत. लोकांना प्रभावित करण्यासाठी, ते पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांसोबतचे मॉर्फ केलेले फोटो वापरत असत. अनेक वेळा लोक आरोपींना दूतावासातील अधिकारी समजत असत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाच्या नावाखाली आरोपी कंपन्या आणि इतर लोकांकडून इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत होते. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, टोळीतील सदस्य शेल कंपन्यांद्वारे हवाला रॅकेट चालवत होते.
अटक करण्यात आलेला आरोपी हर्षवर्धन हा यापूर्वी चंद्रास्वामी आणि अदनान खगोशी (आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेते) यांच्या संपर्कात असल्याचेही आढळून आले आहे. २०११ मध्ये हर्षवर्धनकडून एक बेकायदेशीर सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आला होता. याबाबत त्याच्यावर कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, या प्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या चार आलिशान गाड्या, १२ मायक्रोनेशन्सचे ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’, परराष्ट्र मंत्रालयाचे स्टॅम्प असलेली कागदपत्रे, ३४ देशांचे स्टॅम्प, ४४ लाख रुपये रोख, परकीय चलन आणि १८ डिप्लोमॅटिक नंबर प्लेट जप्त केल्या आहेत.
वेस्ट आर्क्टिका हा एकमेव देश नाही. जगभरात असे अनेक मायक्रोनेशन्स आहेत जे सार्वभौमत्वाचा दावा करतात, परंतु कोणत्याही देशाने त्यांना मान्यता दिलेली नाही.
काय आहे वेस्ट आर्क्टिका?
अमेरिकन नौदलातील अधिकारी ट्रॅव्हिस मॅकहेन्री यांनी २००१ मध्ये ‘वेस्ट आर्क्टिका’ची स्थापना केली आणि नंतर स्वतःला त्याचे ग्रँड ड्यूक म्हणून नियुक्त केले. अंटार्क्टिकामध्ये स्थित, वेस्ट आर्क्टिकाचे क्षेत्रफळ ६,२०,००० चौरस मैल आहे आणि मॅकहेन्री यांनी अंटार्क्टिका करार प्रणालीतील एका पळवाटेचा वापर करून स्वतःला शासक म्हणून घोषित केले. वेस्ट आर्क्टिका असा दावा करते की, तिचे २,३५६ नागरिक आहेत, परंतु त्यापैकी कोणीही प्रत्यक्षात तिथे राहत नाही.