भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सात मार्च रोजी गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली.

मंगळवारी दिलीप घोष यांना पत्रकारांनी गांगुलीच्या भाजपाप्रवेशाबाबत प्रश्न विचारला. त्यावर, “मला याबाबत काहीही कल्पना नाही, पक्षाच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही”, असं उत्तर घोष यांनी दिलं. सात मार्च रोजी कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होणार असून त्या रॅलीमध्ये गांगुली भाजपात अधिकृतपणे प्रवेश घेईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमधील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचंही घोष यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली, पण ‘नवरा’ कोण आहे?”

दरम्यान, गांगुलीकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका २७ मार्चपासून सुरू होणार असून आठ टप्प्यांमध्ये मतदान होईल. २९ एप्रिल रोजी मतदानाची अंतिम फेरी होणार आहे, तर मतमोजणी २ मे रोजी होईल. पश्चिम बंगालमध्ये या वेळी तृणमूल काँग्रेस, कॉंग्रेस-डावी आघाडी आणि भाजपा अशा तिरंगी लढाईचं चित्र दिसू शकतं.