Mamata Banerjee On SIR : गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा (एसआयआर) मुद्या देशभरात चर्चेत आहे. यावरून मोठ्या प्रमाणात वाद उद्भवल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेत जोरदार टीका केली. मात्र, त्यानंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा करत देशातील १२ राज्यांसह काही केंद्रशासित प्रदेशांत एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधी पक्षाचे नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. आता

आता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या एसआयआरची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या एसआयआरच्या प्रक्रियेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी यांनी तर एसआयआर प्रक्रियेला मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याची प्रक्रिया असल्याचं म्हटलं. ‘तुम्ही माझा गळा कापू शकता, पण खऱ्या मतदारांची नावं वगळू नका, मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नका’, अशी संतप्त प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं आणि निवडणूक आयोगाला एसआयआर प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचं आवाहन केलं. तसेच प्रत्येक खऱ्या मतदाराला अंतिम यादीत स्थान मिळेपर्यंत ही प्रक्रिया निर्दोषपणे पार पाडली जात नसेल तर बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी बिहार एवढी सोपी होणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला दिला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “मला आठवतंय जेव्हा शेषन हे निवडणूक आयुक्त होते. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, निवडणूक आयोग जनतेसाठी आहे, सरकारसाठी नाही. मात्र, सध्याचे आयुक्त फक्त ‘येस सर’ आणि ‘येस सर’ असंच बोलत आहेत, हे पाहून मला वाईट वाटतं. तुम्ही बिहारमध्ये हे करू शकता, पण बंगालमध्ये नाही. जिथे आम्ही तुम्हाला प्रत्येक पावलावर प्रश्न विचारू. तुम्हाला फक्त तुमच्या बॉसला खुश करायचं आहे, पण जनतेला नाही. तुम्ही लोकशाही नष्ट करू शकत नाही”, अशी टीका बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केली.

“निवडणूक आयोग फक्त भाजपाच्या सूचनांचं पालन करतं. त्यांना असं बोलल्याबद्दल जर मला शिक्षा करायची असेल तर ते करू शकतात. तुम्ही काय कराल? मला तुरुंगात पाठवाल, माझ्या मागे एजन्सी लावाल, माझे मतदानाचे अधिकार हिरावून घ्याल, हवं तर माझा गळा चिरून टाका, पण लोकांवर अत्याचार करू नका, त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नका”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

कोणत्या राज्यात एसआयआर होणार?

छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडूचेरी, राज्यस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी एसआयआरचा दुसऱ्या टप्प्याची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एसआयआरचा दुसरा टप्पा कधीपर्यंत चालणार?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरोघरी जाऊन मतमोजणी ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत केली जाईल. मतदार यादीचा प्रारूप ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केला जाईल. दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी ९ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत असेल. ज्यांना नोटीस मिळेल त्यांची सुनावणी आणि पडताळणी ९ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत होईल. अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल.