पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आता जवळपास १२ दिवस लोटले आहेत. मात्र, राज्यपाल जगदीप धनखार आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आलेलं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यांच्यातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. राज्यपाल जगदीप धनखार यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील निवडणुकांदरम्यान हिंसाचार झालेल्या कूचबेहेर भागाला भेट दिली. त्यानंतर आज राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सांगताना राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यातले नागरिक पोलिसांकडे जायला घाबरत आहेत. पोलीस तृणमूलच्या कार्यकर्त्यांना घाबरत आहेत. मी पोलिसांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की त्यांच्यासाठी मी छातीवर गोळी खाईन”, असं जगदीप धनखार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांनी वाद टाळावा!

दरम्यान, यावेळी धनखार यांनी मुख्यमंत्र्यांनी वाद टाळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “राज्यातल्या परिस्थितीवर मी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक दृष्टीकोनातून बोलणात आहे. त्यांना जनतेचा कौल मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट वाद टाळायला हवा”, असं राज्यपाल जगदीप धनखार म्हणाले आहेत.

 

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सर्व अंदाज खोटे ठरवत तब्बल २३१ जागा जिंकल्या. तर भाजपाला ७७ जागांवर समाधान मानावे लागले. १० मे रोजी ममता बॅनर्जी यांच्यासोबत ४३ मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला. याहीवेळी राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यातलं वितुष्ट समोर आलं होतं.

ममतांच्या तिसर्‍या मंत्रिमंडळात 43 सदस्यांनी घेतली शपथ

“राज्यासमोर करोनासोबतच हिंसाचाराचं आव्हान”

आता पुन्हा एकदा राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान हा वाद समोर येऊ लागला आहे. कूचबेहेर या ठिकाणी बलताना राज्यपाल धनखार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. “मी हिंसाचार झालेल्या भागाला भेट देणार समजल्यावर मला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय भेट देता येणार नाही असं सांगण्यात आलं. पण मी भेट देणारच असं कळवलं आणि निघालो”, असे ते म्हणाले. “राज्यतील निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले, त्यामुळे आपल्याला धक्का बसला, त्यामुळे जनहितार्थ आपण हिंसाचाराने बाधित असलेल्या अनेक भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, देशासमोर सध्या करोनाचे संकट आहे, तर राज्यासमोर करोनासह निवडणुकीनंतरचा हिंसचार अशी दोन आव्हाने आहेत”, असे देखील राज्यपालांनी सीतालकुची येथे बोलताना म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal governor jagdeep dhankhar slams cm mamata banerjee on violence situation pmw
First published on: 14-05-2021 at 17:05 IST