लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्यापही थांबवण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी स्वत: राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्या पश्चिम बंगाल पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेत आहेत. तसेच आरोपींचा रोहिंग्याशी संबंध असून ते त्यांचा संपर्कात आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हणत ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.

गेल्या अनेक दिवसांपासून तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यातच राज्यात हिंसाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हिंसाचारात भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. तर तृणमूल काँग्रेसनेही भाजपावर आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूला ममता बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले आहे. यापूर्वी भाजपा नेते मुकुल रॉय यांनी संदेशखली येथे हिंसाचारात भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांच्या झालेल्या मृत्यूला ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे म्हटले होते. तसेच ममता यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाषणातून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ल्यासाठी उकसवले असल्याचा आरोप केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रॉय यांनी नुकतीच भंगीपाडा गावात जाऊन हिंसाचारात मृत्यू झालेल्या प्रदीप मंडल आणि सुकांत मंडल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांची भेट घेऊन कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. तसेच या हिंसाचाराला ममता याच जबाबदार असून या प्रकरणी त्यांच्या आदेशावरूनच अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.