आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग टीकेचा धनी ठरला आहे. गुरूवारी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले. यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, आयोगाच्या खुलाशावर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाम विधानसभेच्या पाथरकांडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे उमेदवार कृष्णेंदू पाल यांच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकारण तापलं. या घटनेनंतर निवडणूक आयोगाला धारेवर धरण्याचा प्रयत्न होत आहे. ही गाडी भाजपा उमेदवारांची असल्याचं नंतर लक्षात आलं, असं आयोगाचं म्हणणं आहे. त्यावरून प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे.

आणखी वाचा- गदारोळ! भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

“क्या स्क्रिप्ट है?” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे. “निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम म्हणायचं का?,” असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

आयोगाचं म्हणणं काय?

पाथरकांडी विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन घेऊ जाणारी गाडी लोकांनी पकडली. ही गाडी आयोगाची नव्हती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक कर्मचाऱ्यांची गाडी खराब झाली. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या गाडीला अधिकाऱ्यांनी हात दाखवला. ही कार नंतर भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं, असं आयोगानं सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणी चार अधिकाऱ्यांनाही निलंबित केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What a script priyanka gandhi slams election commission after evm found in bjp candidate car bmh
First published on: 02-04-2021 at 13:09 IST