Trump-Putin Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील बैठक अलस्काच्या अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे झाली. स्थानिक वेळेनुसार डोनाल्ड ट्रम्प सकाळी ११.०८ वाजता एअर फोर्स वन या विमानातून उतरले आणि ते रेड कार्पेटवरून चालत आले. त्यांनी गडद निळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि लाल टाय घातली होती.

ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या स्वागतासाठी उभे राहिले होते. पुतिन जवळ येताच ट्रम्प यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. यानंतर दोघांनी स्मितहास्य करत हस्तांदोलन केले आणि हातावर थाप दिली. यावेळी दोघेही जागितक नेते हास्यविनोद करताना दिसले.

‘अलास्का २०२५’ हे व्यासपीठ केलेल्या ठिकाणी दोन्ही नेते आले आणि त्यांनी पुन्हा एकदा हस्तांदोलन करत फोटो काढले. यावेळी पत्रकारांनी पुतिन यांना युद्धविराम आणि सामान्य नागरिकांच्या हत्या होत असल्याबाबत प्रश्न विचारले तेव्हा पुतिन यांनी त्यांना काहीच ऐकायला येत नसल्याचे हातवारे केले.

ट्रम्प आणि पुतिन गाडीकडे चालत जात असताना त्यांच्या डोक्यावरून अमेरिकन लष्कराची विमाने उडताना दिसली. यावेळी पुतिन काहीसे आश्चर्यचकीत झालेले दिसले. बी-२ स्टेल्थ बॉम्बर आणि इतर लढाऊ विमाने दोन्ही नेत्यांच्या डोक्यावरून जातात.

यानंतर ट्रम्प आणि पुतिन हे ‘द बीस्ट’ नाव असलेल्या अमेरिकन अध्यक्षांच्या लिमोझिनमध्ये बसताना दिसले.

द बीस्ट काय आहे?

अमेरिकन अध्यक्ष प्रवास करण्यासाठी जेव्हा एअर फोर्स वन किंवा मरीन वन हेलिकॉप्टरने प्रवास करत नाहीत, तेव्हा त्यांना द बीस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेसिडेंशियल लिमोझिनमध्ये बसवले जाते. ही गाडी अतिशय मजबूत चिलखती वाहन असल्याचे सांगितले जाते.

२०,००० पौंड वजनाची आणि प्रगत सुरक्षा आणि कम्युनिकेशन प्रणालींनी सुसज्ज असलेली द बीस्ट ही कार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१८ साली राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात सामील झाली. या कारच्या निर्मितीसाठी १.५ दशलक्ष डॉलर्स खर्च झाल्याचे वृत्त आहे.

या कारची माहिती गोपनिय असली तरी एनबीसीच्या वृत्तानुसार, कारमध्ये नाइट व्हिजन, अश्रूधूराच्या नळकांड्या सोडण्याचे लाँचर, इलेक्ट्रिफाईड डोअर हँडल, खिडक्यांना तीन इंच जाडीच्या काचा आणि ८ इंच आर्मर प्लेटिंग आहे. जगातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक असे हे वाहन असल्याचे म्हटले जाते.