Daruma Doll History and Significance: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत-जपान आर्थिक शिखर परिषदे’साठी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुन्मा प्रांतातील ताकासाकी येथे असलेल्या शोरिंझान दारुमा या मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराच्या मुख्या पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना दारुमा बाहुली भेट दिली. या बाहुलीला जपानी संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते.
पंतप्रधान मोदींना ही बाहुली भेट मिळाल्यामुळे आता त्याची चर्चा होत आहे. चेहऱ्यासमान असलेली ही बाहुली आकाराने गोल, आतून पोकळ आणि ठळक रंगांनी रंगवलेली आहे. चिकाटी, लवचिकता आणि सौभाग्य असे गुण ही बाहुली दर्शविते, असे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
झेन बौद्ध धर्माची स्थापना करणाऱ्या भिक्षूवर ही बाहुली आधारित आहे. बाहुलीचे बुड विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे. यामुळे बाहुलीला कितीवेळाही पाडले तरी ती पुन्हा आपल्या मुळ जागेवर येऊन उभी राहते. ‘सात वेळा पडा आणि आठ वेळा उठा’, अशी म्हणही या बाहुलीसंदर्भात जपानमध्ये वापरली जाते.
ध्येय निश्चिती आणि स्वप्नांचा पाठलाग
जपानमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही नवे संकल्प करताना ही बाहुली खरेदी केली जाते. या बाहुलीमुळे यशप्राप्ती होते, असे म्हटले जाते. जेव्हा एखादा व्यक्ती दारुमा डॉल विकत घेतो तेव्हा बाहुलीचा एक डोळा आपल्या ध्येयाच्या नावाने रंगवतो. जेव्हा ते ध्येय गाठले जाईल, तेव्हा दुसरा डोळाही रंगवला जातो. जोपर्यंत दुसरा डोळा रंगवला जात नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला आपल्या ध्येयाची आठवण येत राहते.
भारताशी आहे खास नाते
दारुमा बाहुलीचा संबंध भारताशीही असल्याचे सांगितले जाते. दारुमा मदुराईच्या बोधिसेना नावाच्या बौद्ध भिक्षूपासून प्रेरित होऊन बनविल्याचे सांगितले जाते, असे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. बोधिसेना पाचव्या शतकात चीनमध्ये गेले होते, त्यानंतर तिथून ते जपानला गेले. त्यांनी जपान आणि चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला, असे म्हटले जाते.