प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. याआधी तुषार कपूरला देखील सरोगसीच्याच माध्यमातून एक मुलगा झाला. अनेक सेलेब्रिटी अपत्यप्राप्तीसाठी या माध्यमाचा वापर करत आहेत.
सरोगसी म्हणजे काय?
ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला पालक व्हायचे आहे परंतु काही वैद्यकीय कारणास्तव ते मूलाला जन्म घालू शकत नाही तर त्यासाठी सरोगेट मदरचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडला जातो. सरोगसी म्हणजे उसना गर्भ घेऊन बाळाला जन्म देणे. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. जर पती-पत्नीला मूल हवे आहे परंतु पत्नीला गर्भाशयाचा आजार असेल किंवा दुसरी काही अडचण असेल अशावेळी त्या पुरुषाचे शुक्राणू आणि त्या स्त्रीचे स्त्रीबीज यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते आणि ते सरोगेट मदरच्या गर्भाशयात ठेवले जाते. हा गर्भ नऊ महिने वाढू दिला जातो. त्यानंतर त्या बाळाचा जन्म होतो. किंवा पुरुषाचे बीजाचे आणि स्त्रीबीजाचे आर्टिफिशयल इंसेमनेशनद्वारे फलन केले जाते. त्यातून गर्भ तयार होतो तो स्त्रीच्या गर्भाशयात तो वाढवता येतो.
सरोगसीचा वापर का केला जातो?
जर जोडप्यापैकी एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमतरता आहे आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाने देखील मूल होऊ शकत नसेल किंवा मुलाला गर्भात वाढवणे हे काही वैद्यकीय कारणांमुळे अशक्य असेल तर सरोगसीचा वापर केला जातो. गर्भात संसर्ग झाला असेल तरी सरोगसीचा पर्याय सुचवला जातो.
सरोगेट मदर निवडण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या जातात.
-सरोगेट आईचं वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावं.
-स्त्रीची सरोगेट होण्यापूर्वी एआरटी चाचणी केली जाते. या द्वारे समजते की ती स्त्री गर्भधारणा करण्यास सक्षम आहे की नाही.
-स्त्रीची वैद्यकीय चाचणी घेऊन तिचा रक्तदाब, मधुमेहाची चाचणी, थायरॉइडची चाचणी घेतली जाते.
-जर महिलेनी याआधी एखाद्या सदृढ बालकाला जन्म दिला असेल तर तिची निवड करणे योग्य ठरते.
-सरोगेट होण्यापूर्वी स्त्रीला सर्व कल्पना दिली जाते. तिचे समुपदेशन केले जाते. योग्य अयोग्य बाबींची सर्व समज दिली जाते तसेच तिला कायदेशीर बाबींचे ज्ञान दिले जाते. बाळाला जन्म दिल्यानंतर तुझा कायदेशीररित्या बाळावर काही हक्क राहणार नाही हे देखील सांगितले जाते.