Whats App Chat As Evidence: दिल्लीत २०२० मध्ये दंगलीदरम्यान दाखल झालेल्या पाच खून प्रकरणांमध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स हा ठोस पुरावा असू शकत नाही, असा निर्णय दिल्ली न्यायालयाने दिला आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने असेही म्हटले आहे की या चॅट्सचा वापर ठोस पुरावा म्हणून केला जाऊ शकत नाही.
नऊ जणांच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या नऊ गुन्ह्यांपैकी हे पाच गुन्हे आहेत. दंगलीच्या एका आठवड्यानंतर हे मृतदेह सापडले होते. उर्वरित चार प्रकरणांपैकी एका प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि तीन प्रकरणांमध्ये आरोपींचे म्हणणे ऐकूण घेतले जात आहे.
या दंगलीत एकूण ५३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ५०० हून अधिक लोक जखमी झाले होते. संबंधित पाचही प्रकरणांमध्ये, दिल्ली पोलीस विशेषतः ‘कट्टर हिंदू एकता’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या चॅटवर अवलंबून राहिले. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्रामध्ये या ग्रुपच्या नावाचाही समावेश आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
आरोपपत्रानुसार, आरोपींपैकी एक असलेल्या लोकेश सोलंकीने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज केला होता की, “तुमच्या भावाने रात्री ९ वाजता २ मुस्लिम पुरुषांची हत्या केली.” सोलंकीची चौकशी केल्यानंतर इतरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर ९ खूनांचा आरोप होता.
हिरो बनण्याच्या उद्देशानेच…
आरोपींना निर्दोष मुक्त करताना, करकरडूमा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमचला यांनी पाचही आदेशांमध्ये म्हटले आहे की, “अशा पोस्ट फक्त ग्रुपमधील इतर सदस्यांच्या नजरेत हिरो बनण्याच्या उद्देशानेच टाकल्या जाऊ शकतात. हे कदाचित बढाई मारल्यासारखे असू शकते. त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे, ज्या चॅट्सचा पुरावा म्हणून वापर केला आहे ते हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे असू शकत नाहीत की आरोपीने प्रत्यक्षात दोन मुस्लिम व्यक्तींची हत्या केली होती.”
स्वतंत्र, विश्वासार्ह पुराव्यांचा आधार पाहिजे
आरोपींना निर्दोष सोडताना, न्यायालयाने विश्वासार्ह साक्षीदारांच्या कमतरतेकडेही लक्ष वेधले. हाशिम अलीच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यात, न्यायालयाने ३० एप्रिल रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते आणि १२ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. न्यायालयाने म्हटले आहे की, “ते (चॅट्स) त्यांच्या कमकुवतपणामुळे दोषी ठरवण्याचा एकमेव आधार बनू शकत नाहीत. त्यांना स्वतंत्र, विश्वासार्ह पुराव्यांचा आधार पाहिजे.”