उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या What’s App ग्रुप अॅडमिनला पोलिसांनी रविवारी अट केली आहे. भदोही जिल्ह्यात नगर पालिका परिषद या नावाने हा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टच्या आरोपात ग्रुप अॅडमिनला अटक करण्यात आली आहे. या ग्रुपवरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार सेठ यांनी सांगितलं की ४ ऑगस्टच्या दिवशी सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयीची एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. या प्रकरणी आम्हाला ट्विटरच्या माध्यमातून तक्रारही आली. त्यानंतर हे कळलं की अन्सारी नावाचा युवक यामागे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर व्हॉट्स अॅप ग्रुपचा अॅडमिन शहाबुद्दीन अन्सारी हा या प्रकाराशी संबंधित आहे हे लक्षात आलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.




मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान करणाऱ्या या टिप्पणीचा स्क्रिनशॉट आमच्याकडे आहे. या प्रकरणी जी तक्रार आली त्यानंतर शहाबुद्दीन अन्सारी आणि आणखी एका विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी शहाबुद्दीन अन्सारीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. इंडियन एक्सप्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.