माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. जेटली यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक बड्या नेत्यांनी तसेच क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही ट्विट करुन जेटली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जेटली आणि कोहली यांचे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेमुळे (डीडीसीए) जवळचे नाते होते. २०१५ साली जेटली यांच्यावर डीडीसीएवरुन झालेल्या आरोपांनंतर कोहलीने जेटली यांची बाजू घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटची विशेष आवड असणाऱ्या जेटली यांनी १९९९ पासून ते २०१३ अशी चौदा वर्ष त्यांनी डीडीसीएचे अध्यक्ष पद भूषवले. जेटली हे भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे उपाध्यक्षही होते. जेटलींनी दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळेच दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली. जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असतानाच अगदी सेहवाग पासून विराटपर्यंत अनेकांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली ती दिल्लीतील क्रिकेटला मिळालेल्या नवसंजीवनीमुळेच. त्यामुळेच आज जेटलींच्या निधनानंतर अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केलं आहे. विराटनेही ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जेटलींच्या निधनानंतर विराट कोहलीनेही ट्विट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून खूप दु:ख झाले. जे खरचं खूप चांगले होते. ते नेहमी इतरांना मदत करत. २००६ साली जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते वेळात वेळ काढून माझ्या घरी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” असं ट्विट विराटने केले आहे.

विराटने घेतली होती जेटलींची बाजू

२०१५ साली दिल्लीमधील आम आदमी पक्षाने अरुण जेटली डीडीसीएमधील कारभारावरुन आरोप केले होते. जेटली अध्यक्ष असताना १४ वर्षांच्या काळात झालेल्या आर्थिक घोटाळ्यांकडे त्यांनी कानाडोळा केला असा आरोप ‘आपटने केला होता. जेटलींनी डीडीसीएमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काहीच केले नाही असा आरोपही आपने केला होता. मात्र यावेळी विराट कोहलीने ट्विट करुन तत्कालीन अर्थमंत्री जेटली यांची बाजू घेतली होती. “अरुण जेटली आमच्या संघनेचे अध्यक्ष असल्याचे समधान आहे. त्यांनी कायम खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी काम केलं आहे,” असं ट्विट कोहलीने केले होते.

कोहलीच नाही तर विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांनाही या प्रकरणामध्ये जेटलींची बाजू घेत त्यांनी दिल्ली क्रिकेटसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When virat kohli comes out in support of arun jaitley scsg
First published on: 24-08-2019 at 17:50 IST