Where is Nirav Modi : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली असून त्याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जिअमला विनंती केली असल्याचं बेल्जिअमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, मेहुल चोक्सीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील दुसरा ठग आणि मेहुल चोक्सीचा साथीदार नीरव मोदी कुठे आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायद्या अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल होता. नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांना फरार घोषित केल्यानंतर आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याच्या जंगम आणि स्थावर अशा एकूण ६९२ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती.

तसेच १०५२ कोटी ४२ लाख रूपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकेला परत करण्यात आली आहे. सध्या तो लंडनमधील वेस्टमिन्स्टर तुरुंगात आहे. त्याला मार्च २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. नीरव मोदीने गेल्यावर्षी ब्रिटन येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो तेथील न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नीवर मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

भारतात नीरव मोदीविरोधात तीन यंत्रणा कार्यरत आहेत. पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) फसवणुकीसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), त्या फसवणुकीच्या रकमेच्या कथित मनी लाँडरिंगशी संबंधित अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि साक्षीदारांमध्ये कथित हस्तक्षेपाशी संबंधित फौजदारी गुन्हा दाखल असल्याने पोलीसही त्याच्या मागावर आहेत.

दरम्यान, नीरव मोदीच्याही प्रत्यार्पणाकडे लक्ष लागले आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग वापरून सरकारी पंजाब नॅशनल बँकेतून (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये सार्वजनिक पैसे लुटल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण अवघड

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड करणारे हरिप्रसाद एसव्ही यांनी कर्जबुडव्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत शंका व्यक्त केली आहे. “डॉमिनिका येथे मागे अटक झाली असताना कायदेशीर प्रक्रियेतून चोक्सी निसटला होता. चोक्सीचे प्रत्यार्पण हे सोपे काम नाही. त्याचा खिसा भरलेला आहे. विजय मल्ल्याप्रमाणे चोक्सीदेखील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपमधील सर्वात चांगले वकील नेमण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला भारतात आणणे तितके सोपे होणार नाही”, असं हरिप्रसाद एसव्ही म्हणाले.