देशात असहिष्णुता आहे कुठे? आपला देश जगातील सर्वात व्हायब्रंट लोकशाही असलेला देश असून येथे प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार जगण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार अबाधित आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मंगळवारी म्हणाले. तसेच राजकीय विरोधकांनी राजकीय लढाया करणे आवश्यक आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याचा कांगावा करून प्रत्येक घटनेचा संबंध केंद्र सरकारशी जोडण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असे जेटली यांनी यावेळी विरोधकांना फटकारले.
जेटली म्हणाले, देशातील वातावरणाबद्दल बोलायचे झाल्यास देशात सर्वत्र शांतता आहे. ज्या घटना घडल्या त्या नक्कीच निषेधार्ह आहेत आणि लोकशाहीने समृद्ध असलेल्या या देशात शांतता टीकून राहावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. प्रत्येक गोष्टीचा केंद्राशी संबंध जोडून वाद उपस्थित करणे योग्य नाही.
साहित्यिक आणि दिग्दर्शकांच्या ‘पुरस्कारवापसी’बाबत बोलताना जेटली यांनी देशात सहिष्णुता टिकून असतानाही साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही, असे म्हटले. पुरस्कार हा राष्ट्राचा सन्मान आहे. हा सन्मान देश नाही तर, त्यांच्याच क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांच्या नावाची निवड करून दिला जातो. त्यामुळे तो परत करण्याचे काहीच कारण उद्भवत नाही, असे जेटली म्हणाले.