Where was Jagdeep Dhankhar after his resignation: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी यामागे आरोग्यविषयक कारणे सांगितली. त्यानंतर, धनखड आपल्या राजीनाम्यामागील खरे कारण सांगतील अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तसे झाले नाही. उलट ते सार्वजनिकरित्या समोरही आले नाहीत. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे की, जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबद्दल माहिती का नाही, परंतु आता जगदीप धनखड कुठे आहेत याच्याबद्दल माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अद्याप उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानीच आहेत. धनखड यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नसले आणि ते माध्यमांसमोर आले नसले तरी ते उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी राहत आहेत.

६ ऑगस्ट रोजी राज्यसभा सचिवालयाने धनखड यांचे वरिष्ठ खाजगी सचिव कौस्तुभ सुधाकर भालेकर यांची माजी उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी नियुक्ती केली. धनखड गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चर्च रोडवर बांधलेल्या उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी स्थलांतरित झाले होते. हे सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानासाठी आणि कार्यालयासाठी बांधण्यात आले आहे.

राजीनामा दिल्यानंतर, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सोडून त्यांना मिळत असलेल्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित होतील अशी चर्चा होती. यासाठी त्यांनी स्थलांतरित होण्याची तयारीही सुरू केली आहे. पण, ते अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी राहत आहेत.

उपराष्ट्रपतीपद भूषवल्याने, धनखड यांना दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये टाइप-८ सरकारी बंगल्याचा अधिकार आहे. हा बंगला बराच मोठा असतो आणि तो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख यांना दिला जातो. सहसा त्याचे क्षेत्रफळ आठ हजार ते साडेआठ हजार फूट असते.

संजय राऊत यांचे गृहमंत्र्यांना पत्र

राज्यसभा खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी जगदीप धनखड कुठे आहेत, याबद्दल प्रश्न विचारले आहेत.

संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, माजी उपराष्ट्रपतींबद्दल कोणतीही माहिती नाही, ते कुठे आहेत, त्यांचा सध्याचा पत्ता काय आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे? याबद्दल काहीही स्पष्ट नाही.

याशिवाय कपिल सिब्बल म्हणाले होते की, त्यांनी मिसिंग लेडीज चित्रपटाबद्दल ऐकले आहे, परंतु बेपत्ता उपराष्ट्रपतींबद्दल ऐकले नाही. त्यांनी राजीनामा देऊन बरेच दिवस झाले आहेत पण ते कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही?