Crime News : पांढऱ्या पँटवर सुसाईड नोट आणि भावनिक संदेश लिहून एका तरुणाने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. या सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांचा उल्लेख आहे. दिलीप राजपूत असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या विरोधात त्याच्या पत्नीने मारहाणीची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. या सगळ्याला कंटाळून या तरुणाने आयुष्य संपवलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या फर्रुखाबादची आहे. या सुसाईड नोटमध्ये पोलिसांचाही उल्लेख असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमकी काय घटना घडली?
दिलीप राजपूतच्या पत्नीने त्याच्या विरोधात मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी दिलीपला पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं. यशवंत यादव या पोलीस शिपायाने आणि त्याच्या सहकाऱ्याने तडजोड करुन देतो सांगत ५० हजार रुपये लाच मागितली. दिलीपच्या वडिलांनी सुरुवातीला त्याला पैसे दिले नाहीत. त्यावेळी या शिपायाने त्याला मारहाण केली. ज्यानंतर दुसरा एक पोलीस शिपाई महेश याने ४० हजार रुपये लाच घेतली आणि दिलीप आणि त्याच्या पत्नीमध्ये समझोता घडवून आणला. मात्र दिलीपने आता त्याचं आयुष्य संपवलं आहे.
दिलीपने पांढऱ्या पँटवर लिहिली सुसाईड नोट
दिलीपने त्याच्या पांढऱ्या रंगाच्या पँटवर निळ्या शाईने सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये त्याने पत्नी, तिचे वडील, पत्नीचा भाऊ राजू, पत्नीचे मेहुणे रजनेश यांची नावं लिहिली. त्याचप्रमाणे पोलीस शिपाई यशवंत आणि महेश यांचीही नावं लिहिली. ५० हजार रुपये मागितल्याचाही उल्लेख केला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. यशवंत आणि महेश या दोघांनीही मला थर्ड डिग्री लावून मारहाण केली आणि पैसे मागितले असाही उल्लेख या सुसाईड नोटमध्ये दिलीपने केला आहे. तसंच दिलीप राजपूतने आई वडिलांची माफी मागत आणि भावनिक संदेश लिहून गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
पोलीस अधीक्षांनी काय सांगितलं?
आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून जर दोन पोलीस शिपाई दोषी आढळले तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली की सदर घटनेनंतर आम्ही दोन्ही पोलीस शिपायांना चौकशीसाठी बोलवलं आहे. दिलीपचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान दिलीपच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर तिच्या घरातले लोकही पोलीस ठाण्यात पोहचले होते. ही घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर दिलीपने आज गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.