पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. वयाच्या ७५ व्या वर्षी नरेंद्र मोदी निवृत्त वगैरे होतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र तसं घडलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना भाजपात कसं स्थान मिळत गेलं? शिवाय त्यांना घडवणारी चार मराठी माणसं कोण होती? याबाबत पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
प्रशांत देशमुख यांनी काय म्हटलं आहे?
नरेंद्र मोदींच्या करिअरचा आलेख राजकारणात कसा असू शकतो ते पाहिलं तर कुठलंही राजकीय पाठबळ नसताना ते पुढे आले आहेत. विरोधी पक्षात नरेंद्र मोदी सुरुवातीला होते. असा विरोधी पक्ष होता ज्यावर प्रचंड टीका होत होती. अशा सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर पंतप्रधान झाले. उत्तर प्रदेशातून ते तीनवेळा निवडून आले आहेत. मोदींचा जो ग्राफ आहे तो कोणत्याही राजकीय अभ्यासकाला चिंतन करायला लावणारा किंवा अभ्यास करावासा वाटेल असाच आहे असं मत प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं आहे. थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मतं व्यक्त केली आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना घडवणारी चार मराठी माणसं होती अशी माहितीही प्रशांत दीक्षित दिली. ती माणसं कोण आपण जाणून घेऊ.

मोदींची जडणघडण मराठी माणसांनीच केली-प्रशांत दीक्षित
नरेंद्र मोदींबाबत २०१४ पर्यंत मराठी माणसाला फार काही माहीत नव्हतं. २०१४ ते २०२५ या त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यांकन केल्यास ते कसं दिसतं? असा प्रश्न प्रशांत दीक्षित यांना विचारण्यात आला. त्यावर प्रशांत दीक्षित म्हणाले, ” आपण याबाबत विस्ताराने मूल्यांकन आहेच. पण महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातचा असला तरीही त्यांची सगळी जडणघडण मराठी माणसांनी केली. त्यांचे चार मेंटॉर समजले जातात ते चारही जण मराठी होत.”
लक्ष्मणराव इनामदार यांनी मोदींना टीपलं
संघात जाऊन काम करण्याचं जेव्हा नरेंद्र मोदींनी ठरवलं तेव्हा लक्ष्मणराव इनामदार यांनी त्यांना टीपलं. लक्ष्मणराव इनामदार यांचं गुजरातमध्ये केलेलं संघाचं काम खूप मोठं आहे. मोदी त्यांना मेंटॉर मानत, अजूनही मानतात. इनामदार यांचा मानसपुत्र असंही मोदींना ओळखलं जातं. मोदींनी इनामदार यांच्यावर कविता लिहिल्या आहेत. तसंच इनामदार यांच्या नावे शिक्षण संकुलही उभं केलं आहे. संघ संस्कार मोदींवर घडवणारा आणि रुजवणारा माणूस म्हणजे लक्ष्मणराव इनामदार. त्यांच्यात क्षमता आहे हे लक्ष्मणराव इनामदार होते जे साताऱ्यातल्या खटाव तालुक्याचे होते. फर्ग्युसनचे विद्यार्थी होते. हेडगेवारांनी त्यांना संघात आणलं आणि तेव्हापासून ते संघात आले.
मोदींच्या आयुष्यात आलेले दुसरे व्यक्ती म्हणजे एकनाथजी रानडे
दुसरी व्यक्ती म्हणजे एकनाथजी रानडे. एकनाथजी रानडे यांनी जेव्हा विवेकानंद केंद्राचं काम सुरु केलं तेव्हा मोदी त्यांच्या संपर्कात आले. विवेकानंद केंद्रासाठी आपल्यानंतर मोदींनी काम करावं अशी त्यांची इच्छा होती. ते काही होऊ शकलं नाही कारण संघाने सांगितलं की मोदींना आम्ही भाजपात पाठवणार आहोत. पण एकनाथजी रानडे यांचा प्रभाव नरेंद्र मोदींवर आहे. त्याबाबत सातत्याने मोदींनी माहितीही दिली आहे.
दत्तोपंत ठेंगडी हे तिसरे मोदींचे मेंटॉर
तिसरी व्यक्ती म्हणजे दत्तोपंत ठेंगडी, ज्यांनी भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ अशा संस्था उभ्या केल्या. दत्तोपंत ठेंगडी हे संस्थेचा निर्माण आणि विस्तार शिवाय कार्यकर्त्यांची फौज उभी करणं यातलं कमालीचं व्यक्तिमत्व मानलं जातं. संघ वाढवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. अशी माहितीही प्रशांत दीक्षित यांनी दिली. दत्तोपंत ठेंगडी यांनाही मोदी आपल्याबरोबर हवे होते.
केशवराव देशमुख यांच्या स्कुटरवर मोदी फिरत असत
मोदींच्या आयुष्यातील चौथा मराठी माणूस म्हणजे केशवराव देशमुख होते. १९८१ ते १९८२ मध्ये ते प्रांत प्रचारक म्हणून गुजरातमध्ये काम करत होते. केशवरावांच्या स्कुटरवरुन मोदी सगळीकडे फिरत असत. या चार मराठी माणसांनी मोदींची जडणघडण केली. मोदींची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडण जी आहे त्याचं महाराष्ट्राशी हे नातं आहे. प्रत्येकाकडून त्यांनी विविध प्रकारचे गुण घेतले.